KL Rahul became the third Indian to complete the fastest 2000 ODI runs: भारत आणि पाकिस्तान संघांत आशिया चषकातील सुपर फोर फेरीतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पावसामुळे खेळ थांबवण्यापूर्वी २४.१ षटकानंतर २ बाद १४७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहली ८ आणि केएल राहुल १७ धावांवर नाबाद आहेत. दुखापतीनंतर पुनरागमन करत असलेल्या केएल राहुलने एक खास पराक्रम केला आहे.
केएल राहुलने ४ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, राहुलने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १४ धावा करून एकदिवसीय कारकिर्दीतील २००० धावा पूर्ण केल्या. राहुलने त्याच्या ५५व्या एकदिवसीय सामन्यात आणि ५३ डावांमध्ये हा टप्पा गाठला. केएल राहुल भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहलीनेही इतक्याच डावात २००० धावा पूर्ण केल्या होत्या.
सर्वात जलद 2000 धावा करणारा भारतीय खेळाडू –
पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. वृत्त लिहेपर्यंत राहुल २८ चेंडूत १७ धावा करून खेळत आहे. विराट कोहली ८ धावा करून त्याच्यासोबत क्रीजवर आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन अव्वल स्थानावर आहे. धवनने ४८ डावांमध्ये ही कामगिरी केली होती, तर नवज्योत सिंग सिद्धू आणि सौरव गांगुली संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी ५२ डावात ही कामगिरी केली आहे.
शुबमन गिल आणि रोहित शर्माने झळकावले –
शुबमन गिलने ३७ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध ६७ धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याचबरोबर १५ षटकांनंतर भारताने एकही विकेट न गमावता ११५ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने वनडे कारकिर्दीतील ५०वे अर्धशतक झळकावले. त्याने शादाब खानच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध नाबाद ७४ धावा केल्या होत्या.