IND vs PAK Match Updates Rohit Sharma ODI 300 Sixes Complete: भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण केले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात हिटमॅनने ही खास कामगिरी केली. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माचा समावेश झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला. त्याचबरोबर पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील आठव्या विजय नोंदवला.
वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३१ षटकार, तर माजी पाकिस्तानी फलंदाज शाहिद आफ्रिदीने वनडेमध्ये ३५१ षटकार मारले आहेत. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला होता. आता रोहित शर्माने २४६ एकदिवसीय डावात ३०० षटकारांचा आकडा पार केला. आता त्याचे ३०३ षटकार झाले आहेत.
विश्वचषकात झळकावलीत सर्वाधिक शतके –
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचे अवघ्या १४ धावांनी शतक हुकले. त्याने ६३ चेंडूचा सामना करताना ६ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ८६ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय कर्णधाराने १३१ धावा केल्या होत्या, जे त्याचे वनडे विश्वचषकातील सातवे शतक होते. रोहित विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत त्याने भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने ५ शतके झळकावली होती.
पाकिस्तानचा संघ १९१ धावांवर आटोपला –
या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पाकिस्तान संघाची साधारण सुरुवात पाहिला मिळाली. पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीने पुन्हा एकदा निराशा केली, सलामीवीर अब्दुल्ला शफीकने २० धावांची खेळी केली, तर इमाम-उल हकने ३८ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले. कर्णधार बाबर आझमने ५० धावा केल्या, तर सौद शकीलने ६ धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिझवानने ४९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर आटोपला.