टी -२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताने निराशाजनक सुरुवात केली आहे. रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्याला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १५१ धावा केल्या. पाकिस्तानने हे लक्ष्य १७.५ षटकांत कोणतेही नुकसान न करता साध्य केले. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने शानदार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. 

दरम्यान, रिझवानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान रिझवान जमिनीवर नमाज पढताना दिसला. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने रिझवानचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अल्लाह त्या मस्तकाला कुठेही झुकू देत नाही जे त्याच्यापुढे नतमस्तक होते.”

मोहम्मद रिझवान आणि बाबार आझमचा अनोखा विक्रम

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. हा एक विक्रम ठरला. २०२१ या वर्षामध्ये जगातील कोणत्याच संघाच्या दोन फलंदाजांना हा पराक्रम करता आलेला नाही. विराटनेही सामना संपल्यानंतर या दोघांचं अभिनंदन केल्याचं पहायला मिळालं.

यापूर्वी चार वेळा शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचा सामावेश आहे. तसेच न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्टील आणि के. विल्यमसन यांनीही आतापर्यंत चार वेळा शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. मात्र एका वर्षात चार वेळा हा पराक्रम करणारे रिझवान आणि बाबर हे पहिलेच खेळाडू ठरलेत.

Story img Loader