Mudassar Nazar reaction on IND vs PAK match : जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ मैदानावर आमनेसामने येतात, तेव्हा सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. कारण दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध पराभूत व्हायचे नसते. त्यामुळे या दोन संघांच्या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळते. आता पाकिस्तानचा माजी सलामीवीर मुदस्सर नाझरने रविवारी धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला की ९० च्या दशकात त्याच्या क्रिकेट संघावर खूप दबाव असायचा. लोक त्यांच्या खेळाडूंना बेईमान म्हणायचे आणि जेव्हा जेव्हा संघ हरायचा तेव्हा त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचा संशय घेतला जायचा. विशेषत: भारताविरुद्ध पराभूत झाल्यावर त्यांना हार पचवता येत नव्हती.
पाकिस्तानी संघ ९० च्या दशकातील सर्वात प्रतिभावान संघांपैकी एक होता. १९९२ च्या विश्वचषकाच्या विजयाने हे स्पष्ट झाले, परंतु त्या दिवसांमध्ये मॅच फिक्सिंगची चर्चा होती आणि मुदस्सर नाझरला वाटते की लोकांमध्ये अशा समजामुळे खेळाडू घाबरून जगू लागले होते. ‘क्रिकेट प्रेडिक्टा कॉन्क्लेव्ह’च्या समारोपाच्या भाषणात मुदस्सर नजर म्हणाले, ‘माझ्या मते ९० च्या दशकातील पाकिस्तानचा संघ टॅलेंटच्या बाबतीत ९०च्या दशकात ऑस्ट्रेलियाइतकाच चांगला संघ होता, पण सामना हारण्याची भीती होती आणि मी येथे थोडे वादग्रस्त बोलत आहे.’
मुदस्सर नाझर काय म्हणाला?
मुदस्सर नाझर म्हणाला, ‘वादग्रस्त बोलण्याचे कारण म्हणजे मॅच फिक्सिंग आहे. त्यावेळी पाकिस्तानी संघावर खूप दडपण असायचे, कारण प्रत्येक वेळी सामना हरल्यावर लोकांना वाटायचे की सामना संशयास्पद होता, सामना फिक्स झाला होता. ते एका चांगल्या संघाकडून पराभूत झाले हे कोणीही मान्य करायला तयार नव्हते.’ विशेष म्हणजे भारताविरुद्धच्या पराभवामुळे तर गोष्टी अधिक अवघड व्हायच्या कारण दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये काट्याची टक्कर असायची.’
मॅच फिक्सिंगमुळे पाकिस्तानच्या क्रिकेटवर मोठा परिणाम –
मुदस्सर नाझर पुढे म्हणाला, ‘तुम्ही त्यात आणखी एक पैलू जोडू शकता, जो भारताविरुद्ध खेळण्याचा पैलू आहे. पाकिस्तानी किंवा भारतीय या दोघांनाही एकमेकांविरुद्ध सामना हरायचा नसतो. आम्ही हे शारजाहमध्ये पाहिले आहे. त्यामुळेच येथे भारत विरुद्ध पाकिस्तान असा मोठा सामना व्हायचा.” मॅच फिक्सिंगमुळे पाकिस्तानच्या क्रिकेटवर आणि खेळाडूंच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाला. मॅच फिक्सिंगच्या घटनेने पाकिस्तानच्या क्रिकेटचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढता येणार नाही. हे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर बोजा असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे खेळाडूंना इच्छा असूनही चांगली कामगिरी करता आली नाही आणि ते नेहमीच दडपणाखाली सामने खेळताना दिसले.
हेही वाचा – ‘नाही नाही म्हणत धोनी १० आयपीएल खेळतो…’, अभिनेता शाहरुख खान माहीबद्दल असं का म्हणाला? पाहा VIDEO
कोण आहे मुदस्सर नाझर?
मुदस्सर नाझरने १९७६ ते १९८६ पर्यंत पाकिस्तानसाठी ७६ कसोटी आणि १२२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मुदस्सरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४११४ धावा आहेत. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या २३१ धावा आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १० शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत. जर आपण एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे, तर मुदस्सर नाझरने एकूण २६५३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १६ अर्धशतके झळकावली आहेत, तर त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ९५ धावा आहे. गोलंदाजीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६६ आणि एकदिवसीय सामन्यात १११ विकेट्स घेतल्या आहेत.