India vs Pakistan World Cup 2023: भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वन डे विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघाने काही दिवसांपूर्वी संमती दिली होती. मात्र, पाकिस्तान सरकारच्या वतीने आपल्या टीमला भारतात विशेष सुरक्षा पुरवण्याची चर्चा होती. आता यावर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान संघाला कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक दिली जाणार नाही.
एएनआयशी बोलताना भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघाला विशेष वागणूक मिळणार नाही त्यांनी यावर स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, “पाकिस्तान संघाला कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नाही. पाकिस्तानचा संघ आमच्यासाठी इतर संघांइतकाच महत्त्वाचा आहे. जोपर्यंत सुरक्षिततेच्या समस्यांचा संबंध आहे, हे प्रश्न आमच्या सुरक्षा संस्था आणि आयोजकांना विचारले पाहिजेत.”
यापूर्वी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या संघाला भारतात खेळण्यास मान्यता दिली होती, त्यावेळी ते म्हणाले होते की, “आम्हाला राजकारण आणि खेळ एकत्र आणायचे नाहीत. त्यामुळे आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आमचा क्रिकेट संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.”
१४ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तान संघाने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उत्तम सुरक्षेची मागणी करत संघाला भारतात पाठवण्याची परवानगी दिली. भारताने आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे. भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे आणि अंतिम सामनाही श्रीलंकेत होणार आहे.
पाकिस्तान संघ भारतातील ५ शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळणार आहे
आगामी एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान संघ भारतातील ५ शहरांमध्ये आपले सामने खेळणार आहे. यामध्ये हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यांचा समावेश आहे. पाकिस्तानचा संघ या मोठ्या स्पर्धेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. त्याचवेळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला तो भारताशी मुकाबला करेल. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी चाहत्यांना २ सप्टेंबरला आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघ ७ वर्षांनंतर भारतात येत आहे. भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी आणि मोठ्या सामन्यांमध्ये एकमेकांसमोर येतात. यापूर्वी २०१६ मध्ये पाकिस्तान टी२० वर्ल्ड कपसाठी भारतात आला होता. भारत प्रथमच संपूर्ण विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. २०११ मध्ये भारताने संयुक्तपणे याचे आयोजन केले होते, ज्यामध्ये भारताने विजेतेपद पटकावले होते. १९८३ नंतर भारताचे हे दुसरे एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद होते. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही.