PCB Announces India’s Match Venues : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी जवळपास सर्व संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. आयसीसीने संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख १ मे दिली होती. त्यामुळे सर्व संघांनी ३० एप्रिल आणि १ मे रोजी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. कोट्यवधी चाहत्यांना याबद्दल आधीच उत्सुकता होती, आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्साह आणखी वाढणार आहे. पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळल्या जाणाऱ्या भारतीय संघाच्या सर्व सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताचे सर्व सामने एकाच मैदानावर खेळवले जातील.
या मैदानावर होणार भारताचे सर्व सामने –
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद भूषवणार असला, तरी भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन स्पर्धा खेळण्यास नकार देऊ शकतो. याबाबत पीसीबीने आयसीसीकडे तक्रारही केली होती की, भारताने पाकिस्तानमध्ये सामने खेळायला यावे. याबाबत पाकिस्तानने भारताच्या सर्व सामन्यांची ठिकाणे जाहीर केली आहेत.
भारतासाठी निश्चित करण्यात आलेले ठिकाण लाहोरचे स्टेडियम आहे. जर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला तर त्याचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही याच मैदानावर होणार आहे.
हेही वाचा – Richard Gleeson : पर्दापणाच्या सामन्यात रोहित, विराट आणि ऋषभला बाद करणारा शिलेदार आता धोनीसेनेत
आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात गेला नव्हता –
याआधीही आशिया कप २०२३ चे आयोजन पाकिस्तानने केले होते. पण भारताने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले. आता हीच खिचडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीपासून शिजवली जाऊ लागली आहे. मात्र पाकिस्तानने भारताच्या सर्व सामन्यांची ठिकाणे जाहीर केली आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की आयसीसी पुन्हा भारतासाठी नव्या ठिकाणाचा शोध घेणार हे पाहणे बाकी आहे.