India Dressing Room Best Fielder Medal Video: भारत वि. पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढतीत टीम इंडियाने बाजी मारली आहे. भारतीय संघाने हा सामना ६ गडी राखून जिंकत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. या विजयानंतर भारताच्या ड्रेसिंग रूममधील व्हीडिओ समोर आला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर कोणत्या खेळाडूला बेस्ट फिल्डरचं मेडल मिळालं आहे, जाणून घेऊया. हे मेडल देण्यासाठी भारतीय संघाचा माजी सलामीवीर मिस्टर आयसीसी शिखर धवनला बोलवण्यात आले होते.

आयसीसी स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला बीसीसीआयकडून मेडल दिलं जातं. प्रत्येक सामन्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेल्या ३ खेळाडूंना नॉमिनेट केलं जात आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने या विजयी खेळाडूचं नाव जाहीर केलं जात. पाकिस्तानविरूद्ध सामन्यात सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केली होती. भारताच्या गोलंदाजी विभागाने पाकिस्तानच्या धावांवर अंकुश ठेवत संघाच्या विजयाचा पाया रचला.

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाचे फिल्डिंग कोच टी. दिलीप हे मेडल पटकावणाऱ्या खेळाडूंची नाव जाहीर करत संघाने केलेल्या फिल्डिंगबाबत बोलतात. मेडलसाठी सर्व जण एकत्र जमण्यापूर्वी रोहित शर्माने टी दिलीप यांना सांगितलं की, तुम्ही फिल्डिंगबद्दल बोलताना पूर्ण वेळ हे असं हसत बोला, अगदी असे दात दाखवत बोला, रागात बोलू नका… हे ऐकून टी दिलीपदेखील हसू लागले.

यानंतर ची दिलीप यांनी खेळाडूंचं कौतुक करत रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या तीन खेळाडूंना मेडलसाठी नॉमिनेट केलं होतं. यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याचा बेस्ट फिल्डर जाहीर करण्यासाठी मिस्टर आयसीसी शिखर धवनला बोलवण्यात आले होते. शिखर धवनने जबरदस्त एंट्री घेतली आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. यानंतर शिखरने अक्षर पटेलला फिल्डर ऑफ द मॅचचे मेडल दिले. भारत-पाकिस्तान सामन्यात इमाम उल हकला कमालीचा थ्रो करत अक्षरने धावबाद करत भारताला दुसरी विकेट मिळवून दिली होती. यानंतर पाकिस्तानच्या धावांना चांगलाच ब्रेक लागला होता.

इमाम उल हक व्यतिरिक्त, अक्षरने हारिस रौफलाही यष्टिरक्षक केएल राहुलकडे दमदार थ्रो करत धावबाद केले. याशिवाय पटेलने आपल्या गोलंदाजीने पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिझवानलाही क्लीन बोल्ड केले होते, ज्याने संघाचा डाव सावरला होता. अक्षरने १० षटकांत ४९ धावा देत १ विकेटही आपल्या नावावर केला होता.

Story img Loader