IND vs PAK Shoaib Akhtar ICC Champions Trophy 2025 : विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ६ गडी व ४५ चेंडू राखून मोठा विजय मिळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला आणि त्याचं ५१ व एकदिवसीय शतकही पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ४९.४ षटकांत २४१ धावांवर पाकिस्तानचे सर्व फलंदाज बाद करत त्यांचा डाव संपुष्टात आणला. कुलदीप यादवने ९ षटकांत ४० धावा देत ३ बळी घेतले. तर, ८ षटकांत ३१ धावा देत २ बळी घेतले. यासह रवींद्र जडेजा, हर्षित राणा व अक्षर पटेलने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर पाकिस्ताने दिलेलं हे आव्हार भारतीय फलंदाजांनी चार गड्यांच्या बदल्यात ४३.३ षटकांत पूर्ण केलं.

दरम्यान, पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतर त्यांच्या देशातील क्रिकेटरसिक नाराज आहेत. मात्र, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर म्हणाला, “या सामन्याचा निकाल पाहून मला काही आश्चर्य वाटलं नाही. कारण, आपला संघ दुबळा होता. यामध्ये आपल्या संघ व्यवस्थापनाच्या चुका आहेत”.

हा निकाल पाहून मी निराश झालो नाही : अख्तर

शोएब अख्तर म्हणाला, “भारत पाकिस्तान सामन्याचा जो काही निकाल लागला आहे तो पाहून मी निराश झालेलो नाही. कारण मला अशा निकालाची कल्पना होतीच. पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाला पाच गोलंदाज देखील निवडता आले नाहीत. जगभरातील अनेक संघ सहा गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरत आहे आणि पाकिस्तानचा संगम मात्र दोन अष्टपैलू खेळाडूंसह मैदानात उतरला होता संघ व्यवस्थापनाच्या बिनडोक व मूर्खपणामुळे आपल्याला हा पराभव पहावा लागला आहे. त्यामुळे त्या बिचाऱ्या मुलांना (पाकिस्तानी संघातील खेळाडू) आपण काय बोलणार?संघ व्यवस्थापन जसं आहे त्याचप्रमाणे आपली मुलं क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे मी हा निकाल पाहून बिलकुल निराश झालो नाही.”

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला, “संघ व्यवस्थापनाच्या चुकांमुळे संघातील खेळाडूंना नेमकं करायचं काय आहे तेच माहिती नव्हतं. त्यांच्याकडे तो आक्रमकपणा नव्हता. आपल्या खेळाडूंमध्ये चांगलं कौशल्य दिसलं नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल ज्याप्रमाणे खेळत होते तसं पाकिस्तानच्या फलंदाजांना खेळता आलं नाही. आपल्या फलंदाजांनी नको त्यावेळी हवेत फटके मारले. भारतीय फलंदाजांनी ती चूक केली नाही. संघ व्यवस्थापनाने कोणताही विचार न करता, नियोजन न करता आपल्या मुलांना मैदानात पाठवलं. त्या बिचाऱ्या मुलांना मैदानात जाऊन काय करायचं तेच माहिती नव्हतं. मी पुन्हा एकदा सांगतो मी संघ व्यवस्थापनामुळे निराश झालो आहे.

Story img Loader