ICC World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाबाबत मोठे विधान केले. त्याच्या मते, “२०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतावर खूप दडपण असणार आहे.” शोएब म्हणाला की, “यजमान संघावर सर्वात जास्त दबाव त्यांच्याच माध्यमांकडून टाकला जात आहे.” एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार असून या महामुकाबल्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. त्याला एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला की, “या सामन्याबाबत पाकिस्तानवर किती दबाव असेल आणि ते त्याला कसे सामोरे जातील?” यावर त्याने मजेशीर उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न घाबरता खेळून पाकिस्तान विश्वचषक जिंकू शकतो- अख्तर

स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शोएब अख्तर म्हणाला की, “पाकिस्तानने न घाबरता खेळल्यास वन डे विश्वचषक जिंकू शकतो. भारतात ५०,००० पेक्षा कमी लोक सामना पाहू शकतील असे कोणतेही स्टेडियम नाही. वर्ल्डकपमध्ये जेव्हा भारताचा सामना पाकिस्तानशी होईल तेव्हा २ अब्ज लोक हा महामुकाबला पाहतील.” पाकिस्तान संघाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की, “पाकिस्तान संघात केवळ १५ खेळाडू आहेत जे एकत्र असतील आणि त्यांना संपूर्ण स्पर्धेदरम्यान एकमेकांना आत्मविश्वास द्यावा लागेल.”

मीडिया भारतावर जास्तीत जास्त दबाव आणेल

शोएब अख्तर म्हणाला की, “या वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतावर दबाव असेल कारण, हिंदुस्तानी मीडिया हा संघ पाकिस्तानविरुद्ध अपराजित असल्याचा प्रचार करेल.” तो पुढे म्हणाला की, “भारतीय मीडिया देखील पाकिस्तानवर प्रचंड अशा स्वरूपाचा दबाव आणेल आणि ते हा सामना महाभारतासारखा बनवतील. खेळापूर्वी अशा प्रकारची चर्चा म्हणजे अनावश्यक दडपण तयार करते. ते म्हणतील की, भारतीय संघ पाकिस्तानला सहज पराभूत करेल आणि इथेच गोष्टी उलटू शकतात. त्यामुळे रोहित शर्मा आणि भारतावर खूप दडपण असेल कारण ते आधीच विजेते म्हणून दाखवले जाणार आहेत. पाकिस्तानवर कुठलाही दडपण नसेल कारण, आमचा मीडिया हे पराभूत होतील अशी अपेक्षा आतापासूनच करत आहे.”

हेही वाचा: Football Kings Cup 2023: भारताकडून अंपायर्सने विजय हिरावून नेला? इराकविरुद्ध टीम इंडियाचा ७-६ने पराभव, फायनलचे स्वप्न भंगले

भारताकडे सेटल प्लेइंग इलेव्हन नाही, असा दावा पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला आहे. आशिया चषक २०२३ पूर्वी अनेक खेळाडू संघाचा भाग होते, मात्र आता दुखापतग्रस्त वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. शोएब अख्तरचे असे मत आहे की, या कारणामुळे भारत दोन वर्षांपासून योग्य प्लेइंग इलेव्हन निवडू शकला नाही. पाचव्या क्रमांकावर कोण खेळेल हे त्यांना माहीत नाही.

स्टार स्पोर्ट्सशी झालेल्या संभाषणात शोएब अख्तर म्हणाला, “मला वाटते की भारत गेल्या दोन वर्षांपासून योग्य प्लेइंग इलेव्हनची निवड करू शकला नाही. मला असे वाटते की, संघ स्थिर झालेला नाही, दुखापतींमुळे तीन किंवा चार खेळाडूंना बदलण्यात आले आहे. त्यामुळे तुमचा संघ डळमळीत दिसत आहे. आम्हाला अद्याप माहित नाही की चार प्रमुख फलंदाज कोण आहेत आणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळेल?”

तो पुढे म्हणाला, “इशान किशन चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. तो अप्रतिम कामगिरी का करत आहे? कारण, त्याला ही कल्पना आली आहे की तुम्ही त्याला एकतर सलामीला तरी खेळवाल किंवा मिडल ऑर्डरमध्ये. त्याने त्याची मानसिकता तयार केली आहे की, ‘मी येथे संघासाठी खेळत आहे आणि त्यासाठी कुठेही धावा करणार हे नक्की.’ हार्दिक पांड्या पुन्हा एकदा भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. त्याची अष्टपैलू कामगिरी टीम इंडियासाठी प्लस पॉइंट आहे.”

हेही वाचा: Rohit Sharma: बलात्काराचा आरोप असणारा संदीप लामिछानेसोबत फोटो काढणे रोहितला पडले महागात; सोशल मीडियावर चाहत्यांकडून ट्रोल

शोएबने पुढे असा दावा केला की, “गेल्या दोन वर्षांपासून भारताचा संघ योग्य रीतीने ठरलेला नाही. हे खूप विचित्र आहे कारण, तुम्हाला कोणाला कुठे खेळायचे हे माहित नाही. मात्र, तरीही तुम्हाला माहित आहे की आपण वरिष्ठ नावजलेले खेळाडू असून आपण प्लेईंग ११ मध्ये असणार आहे. यासाठी तुम्ही कोणत्याही युवा खेळाडूला संघातून बाहेर काढू शकतात. ही रोहित आणि विराट कोहलीसारखी मोठी नावे आहेत, त्यामुळे ही वाईट पद्धत आहे. त्या वरिष्ठ खेळाडूंना सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल.”

विश्वचषकाबाबत शोएब अख्तर शेवटी म्हणाला, “वर्ल्डकपमध्ये  जाताना, भारतात पाकिस्तानविरुद्ध खेळताना पाकिस्तान लहान भाऊ होईल. जेव्हा हे दोघे एकमेकांसमोर येतील तेव्हा वर्ल्डकपबद्दल कोणीही बोलणार नाही. फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान असू द्या. मला विश्वास आहे की गेल्या ५०-६० वर्षांतील हा सर्वोत्तम विश्वचषक असेल ज्याचे आयोजन भारत करत आहे आणि याच वर्ल्ड कपमधून आम्ही टीम इंडियाला बाहेर काढू.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak shoaib harbhajan clash ahead of world cup akhtar said we will win against team india avw