Shubman Gill said that my goal is to help Team India win World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही. २४.१ षटकांनंतर पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला. यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही. या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर शुबमन गिलने आपल्या सर्वात महत्त्वाच्या ध्येयाबद्दल सांगितले आहे. हॉटस्टारशी संवाद साधताना गिल म्हणाला की, एक खेळाडू म्हणून माझे सध्याचे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे की पुढील महिन्यात सुरु होणारा विश्वचषक २०२३ भारतासाठी जिंकणे.
शुबमन गिल या योजनेवर काम करणार –
विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये सामील झालेला शुभमन गिल म्हणाला की, सध्या एक खेळाडू म्हणून माझे सर्वात महत्त्वाचे लक्ष्य विश्वचषक जिंकणे आहे. गिल म्हणाला की सध्या त्याची मानसिकता फक्त खेळपट्टीला पटकन समजून घेण्याची आहे. तसेच तो म्हणला, मी विश्वचषकात त्याच योजनेवर काम करेन. पाकिस्तानविरुद्ध ५८ धावा करणाऱ्या गिलने सांगितले की, विश्वचषकात मानसिक समायोजन करणे खूप महत्त्वाचे असेल.
गिलला २०११ च्या विश्वचषक विजयाची आठवण –
या संभाषणात २०११ च्या विश्वचषकाचा संदर्भ देत शुभमन गिलने सांगितले की, २०११ मध्ये भारत जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन बनला, तेव्हा मी तरुण होतो. त्या प्रतिमा माझ्या मनात आहेत आणि त्या स्थितीत पोहोचण्याचा माझा विचार आहे. एक फलंदाज म्हणून, परिस्थितीचे आकलन करणे आणि ते त्वरीत समजून घेणे खूप महत्वाचे आहे, तरच तुम्ही तुमच्या खेळासाठी तुमची योजना तयार करू शकता. खेळात तुमची मानसिकता महत्त्वाची भूमिका बजावते. मला विश्वास आहे की, मानसिक बदल करण्यास सक्षम असणे खूप महत्वाचे आहे.
हेही वाचा – Ind vs Pak: “आता मला स्वप्नातही विराट दिसतो”, वासिम अक्रमनं सांगताच किंग कोहली म्हणाला…!
गिलसाठी २०२३ हे वर्ष शानदार राहिले –
२०१९ पासून भारताकडून खेळत असलेला शुबमन गिल पहिला विश्वचषक खेळणार आहे. त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत त्याने २९ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६३.०८ च्या उत्कृष्ट सरासरीने १५१४ धावा केल्या आहेत. गिलसाठी २०२३ हे वर्ष आश्चर्यकारक ठरले. त्याने भारतासाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा केल्या आहेत. २०२३ मध्ये, गिलने १४ सामने खेळले आणि १४ डावात ६८.९१ च्या सरासरीने आणि १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ८२७ धावा केल्या. या काळात गिलने द्विशतकही (२०८) केले आहे. गिलने २०२३ मध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.