भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघ शेवटच्या वेळी २४ ऑक्टोबर रोजी आमनेसामने आले होते. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने टीम इंडियाला हरवले. त्यामुळे कप्तान म्हणून विराट कोहलीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. विराटने आता टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बदला घेण्याची जबाबदारी आता रोहितवर आहे.
स्पोर्ट्स पॅव्हेलियन आणि न्यूज १८च्या वृत्तानुसार, २०२२ टी-२० आशिया कप सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणार आहे. आशिया खंडातील सर्व संघ स्पर्धेत प्रवेश करतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत श्रीलंकेला यजमानपद देण्यात आले. २०२३ आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार आहे. ही स्पर्धा ५० षटकांची असेल. पण टीम इंडिया हा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार का, याबाबत अजून काही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत.
हेही वाचा – T20 WC : टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर ICCचे उघडले डोळे; उचलणार ‘मोठं’ पाऊल!
टी-२० आशिया चषकाशिवाय पुढील वर्षी टी-२० विश्वचषकही होणार आहे. ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेचे यजमानपद (T20 World Cup 2022) मिळाले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यामध्येही भारत आणि पाकिस्तान आमनासामने येऊ शकतात. सध्याच्या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानने ६ पैकी ५ सामने जिंकले. उपांत्य फेरीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, टीम इंडियाला ४ पैकी फक्त ३ सामने जिंकता आले.
भारत-पाकिस्तान आणि टी-२० क्रिकेट
टी-२० च्या एकूण रेकॉर्डवर नजर टाकली, तर टीम इंडियाचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने ७ तर पाकिस्तानने २ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांना बऱ्याच कालावधीपासून टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावता आलेले नाही. टीम इंडियाने 2007 मध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकला होता, तर २००९ मध्ये पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता.