IND vs PAK, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकात भारताविरुद्धच्या खराब कामगिरीबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी टीका केली आहे. त्यांनी या पराभवाचे वर्णन ‘दुःखद’ आणि ‘वेदनादायक’ असे केले. भारताने पाकिस्तानला १९१ धावांत गुंडाळले आणि त्यानंतर, रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर अहमदाबादमध्ये शनिवारी सुमारे २० षटके शिल्लक असताना सात गडी राखून विजय मिळवला.
रमीझ यांनी आयसीसी रिव्ह्यू पॉडकास्टलाशी बोलताना टीका केली
रमीझ राजाने आयसीसी रिव्ह्यू पॉडकास्टला सांगितले की, “हा पराभव पाकिस्तानला खूप दुखावणार आहे. हे एक भयानक अशा स्वरूपाचे स्वप्न आहे. हा पराभव पाकिस्तानच्या कायम लक्षात राहील. भारताने पाकिस्तानला नुसते हरवले नाही तर संपूर्ण मानसिक खच्चीकरण केले आहे. पाकिस्तानचा संघ सर्वच बाबतीत मागे पडला. क्रिकेटच्या तिन्ही विभागात खराब कामगिरी केल्यामुळे लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. जर तुम्ही जिंकू शकत नसाल तर किमान स्पर्धा करा. तुम्ही न लढताच हरला याने जास्त दुखावले गेलो आहोत.”
विश्वचषकात पाकिस्तानचा सलग आठवा पराभव
हा पराभव पाकिस्तानचा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारताकडून सलग आठवा पराभव होता. यावर रमीझ राजा म्हणाले की, “ही पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी पाकिस्तानला काहीतरी मार्ग शोधावा लागेल.” ते पुढे म्हणाले, “८-० हे वास्तव आहे आणि ८-१ करण्यासाठी पाकिस्तानला खूप प्रयत्न करावे लागतील. त्यांना भारताविरुद्ध ‘चोकर्स’ म्हणता येणार नाही कारण हा मोठा टॅग नाही. या प्रकारचा पराभव हा एक मानसिक अडथळा आहे, तो एक संघातील खेळाडूंचे कौशल्य नाही असे दर्शवतो.”
भारताविरुद्ध खेळाडूंवर दबाव आहे
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंना खूप दडपणातून जावे लागते, असे ६१ वर्षीय रमीझ यांनी कबूल केले, परंतु त्यांनी यातून वर येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. रमीझ म्हणाले की, “जेव्हा तुम्ही भारताविरुद्ध खेळत असता तेव्हा असे वातावरण असते. येथे तर ९९ टक्के भारतीय चाहते आणि निळा समुद्र होता. तुमच्यावर साहजिकच दबाव असतो. मला हे सर्व समजते, पण बाबर आझमने पाच वर्षे या संघाचे नेतृत्व केले. अशा स्थितीतून कसे बाहेर पडावे आणि संघाचे मनोबल उंचवावे, हे त्याच्याच हातात आहे.”
पाकिस्तान संघाला रमीझ यांनी भारताकडून शिकण्यास सांगितले
अशा महत्त्वाच्या लढतींमध्ये दबावाला सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताकडून शिकावे, असे आवाहन रमीझ राजांनी केले. ते म्हणाले, “पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे श्रेय भारताला जाते. भारतासाठीही हा सामना सोपा नाही कारण त्यात भावना, अपेक्षा गुंतलेल्या होत्या. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा विजय खूप मोठा असेल. एक पर्याय आहे, कारण भारतीय संघावर थोडे जास्तीचे दडपण येऊ शकते म्हणून हे बर्याच वर्षांपासून घडत आहे, परंतु त्यांनी ते खूप चांगले हाताळले आहे. हे पाकिस्तान संघाने शिकावे.”
बाबरला हा सल्ला दिला
रमीझ राजा यांनी कर्णधार बाबर आणि पाकिस्तानच्या इतर वरिष्ठ खेळाडूंना तरुणांसोबत एकजूट ठेवण्यास सांगितले, जेणेकरुन ते त्यांच्या पुढील सामन्यांमध्ये पूर्ण ताकदीने खेळू शकतील. दोन विजय आणि चार गुणांसह पाकिस्तान अजूनही विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या स्पर्धेत आहे. ते म्हणाले, “बाबर आझम आणि वरिष्ठ खेळाडूंना काही युवा खेळाडूंसह उत्तरे शोधावी लागतील. संघाच्या मीटिंगमध्ये हा विषय चर्चेला असावा. हा पराभव भयावह असा होता, मला वाटतं पाकिस्तानने इथून नव्याने सुरुवात करायला हवी.”