U-19 India vs Pakistan Asia Cup: आज अंडर-१९ आशिया चषक २०२३च्या ‘अ’ गटात सर्वात मोठे प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडत आहेत. होय, आम्ही बोलत आहोत अंडर १९ भारतीय क्रिकेट संघ आणि अंडर १९ पाकिस्तान क्रिकेट संघ. दोन्ही संघांमध्ये आज जोरदार लढत होत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपले पहिले सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत जो आजचा सामना जिंकेल तो आपल्या गटात अव्वल स्थानावर येईल. मात्र, चांगल्या नेट रन रेटमुळे पाकिस्तान सध्या अव्वल आहे. दोन्ही संघांमध्ये स्पर्धात्मक सामना पाहायला मिळत आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर २६० धावांचे आव्हान ठेवले आहे.
पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. भारतीय फलंदाजांना झटपट धावा काढू दिल्या नाहीत. त्यांनी ठराविक अंतराने टीम इंडियाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताला २७० ते २९० धावांचा आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून सलामीवीर आदर्श सिंह, कर्णधार उदय सहारन आणि सचिन दास यांनी अर्धशतके झळकावली.
आदर्श सिंहने ८१ चेंडूत ६२ धावा करून बाद भारताचा डाव सावरला मात्र, तो त्या खेळीचे शतकात रुपांतर करू शकला नाही त्याला अराफत मिन्हासने साद बेगकरवी झेलबाद केले. तो बाद होताच उदय सहारन ९८ चेंडूत ६० धावा करत कर्णधारपदाला साजेशी खेळी केली, त्याला उबेदने रियाजुल्लाहवी झेलबाद केले. तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत सचिन दासने ४८ चेंडूत ५४ धावांची तुफानी खेळी करत भारताला अडीशेचा आकडा पार करून दिला. अर्शीन कुलकर्णी २४ चेंडूत २४ धावा करून बाद झाला, आमिर हसनने त्याला साद बेगकरवी झेलबाद केले. बाकी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करताला आली नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद जीशानने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. आमिर हसन आणि उबेद शाह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अराफत मिन्हासने एक विकेट घेतली.
दोन्ही संघातील प्लेईंग-११ पुढीलप्रमाणे खेळत आहे
भारत अंडर-१९ संघ: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, रुद्र पटेल, उदय सहारन (कर्णधार), मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी.
पाकिस्तान अंडर-१९: शमिल हुसेन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोहम्मद जीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफत मिन्हास, अली असफंद, अमीर हसन, उबेद शाह.