Shahid Afridi on IND vs PAK Match : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ मधील १२ व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडले. या सामन्यात पाकिस्तानचा भारताविरुद्ध दारुण पराभव झाल्यामुळे समाजमाध्यमांवर पाकिस्तानी संघाची थट्टा केली जात आहे. तर पाकिस्तानी संघाचे समर्थक आपल्या संघाला पुढच्या सामन्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनेही पाकिस्तानी संघाचं कौतुक केलं आहे. तसेच त्याने भारताचंही अभिनंदन केलं. परंतु, भारताचं अभिनंदन करताना आफ्रिदीने भारतीय संघाला टोमणा मारला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर शाहीद आफ्रिदीने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे, क्रिकेटपटू म्हणून आम्ही आमच्या देशाचे ऋणी आहोत. क्रिकेटच्या मैदानात आम्ही उत्तम खेळ करू. परंतु, कालच्या सामन्यात आपल्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची उणीव पाहायला मिळाली. आमचा संघ महान आहे. परंतु, त्यांनी केवळ जबरदस्त लढाई करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचं अभिनंदन, तुम्ही प्रत्येक विभागात उत्तम कामगिरी केली. परंतु, आपल्या पुढच्या सामन्यापर्यंतच या विजायचा आनंद साजरा करा.
शाहीद आफ्रिदीने एकप्रकारे टीम इंडियाला टोमणा मारला आहे. त्याचबरोबर पुढच्या सामन्यासाठी आत्ताच आव्हान दिलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनी साखळी फेरीत उत्तम कामगिरी केली तर हे संघ उपांत्य फेरीत दाखल होऊ शकतात. त्यामुळे हे दोन संघ उपांत्य फेरीत आमने-सामने येऊ शकतात. किंवा उपांत्य फेरीत (इतर संघांविरोधात) जिंकले तर कदाचित अंतिम सामन्यात एकमेकांसमोर येऊ शकतात.
पाकिस्तानचा दारूण पराभव
विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (१४ ऑक्टोबर) खेळवण्यात आलेल्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला अवघ्या ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद केलं. प्रत्युत्तरात भारताने कर्णधार रोहित शर्माच्या धडाकेबाज खेळीच्या (६३ चेंडूत ८६ धावा) जोरावर ३०.३ षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात १९२ धावा करून हा सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवली आहे. भारताचा हा पाकिस्तानविरुद्धचा आठवा विजय आहे.