India vs Pakistan, World Cup: वर्ल्ड कप २०२३चा १२वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पुन्हा एकदा ‘हिटमॅन’ रोहित शर्माची बॅट झळकली. त्याने ३६ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५३वे अर्धशतक झळकावले. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शून्य धावांवर बाद झाल्यानंतर रोहितने शानदार पुनरागमन केले आहे. प्रथम त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले आणि आता पाकिस्तानविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात त्याने ५०+ धावा केल्या. मात्र, एवढी चांगली फलंदाजीकरूनही भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर रोहित शर्मावर नाराज आहेत.
पाकिस्तानने सामन्यात टीम इंडियासमोर १९२ धावांचं माफक लक्ष्य होते. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. डेंग्यूतून बरा होऊन संघात परतलेल्या शुबमननं मारलेले कव्हर ड्राईव्ह तो फॉर्ममध्ये असल्याचे दर्शवत होते. त्याच्या फटक्यांमध्ये एक वेगळीच ताकद होती. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. शुबमन लवकर बाद झाल्यानंतर भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी दोन्ही अनुभवी खेळाडूंवर होती. ९व्या षटकात विराट धावबाद होता होता थोडक्यात बचावला.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या षटकात रोहित स्ट्राईकवर होता. रोहितनं फुल टॉस चेंडू मिड ऑनला मारला. तिकडे शाहीन शाह आफ्रिदी क्षेत्ररक्षण करत होता. त्याच्याकडे चेंडू थोडा वेगात पोहोचला. त्यामुळे कोहलीनं रोहितला धाव घेण्यास नकार दिला. मात्र, रोहितने क्रिझ सोडली होती, त्यामुळे नाईलाजाने कोहलीला धावणं भाग पडलं. अखेरच्या क्षणी स्वतःची विकेट वाचवण्यासाठी विराटने डाईव्ह मारली. शाहिन आफ्रिदीचा नेम चुकला आणि भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. नाहीतर कोहलीला तंबूत परतावं लागलं असतं. त्यानं मारलेली डाईव्हही त्याला वाचवू शकली नसती.
रोहित शर्माने धाव घेण्यासाठी विराटला कॉल दिला होता. त्यावेळी विराटचं संपूर्ण लक्ष हे चेंडू आणि शाहीनवर होतं. तिथे धाव निघू शकत नसल्याचा अंदाज कोहलीला आला होता. त्यामुळे त्याने रोहितला नकार दिला होता. पण रोहित नॉन स्ट्राईकला पोहोचण्यासाठी वेगात पळत सुटला होता. यावरुन माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज समालोचक सुनिल गावसकर यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “जिथे धावच नव्हती तिथे अशी जोखीम का पत्करायची? याचे कारणचं मला कळत नाही. लहान धावसंख्येचा पाठलाग करताना एवढी घाई करण्याची काय गरज होती?” असा सवाल विचारात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मागेही अनेकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र खेळत असताना एकमेकांतील विसंवादामुळे अनेकदा धावबाद झाले आहेत. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये झालेल्या सामन्यात असाच प्रकार घडला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजी करत असताना कोहली पाचवेळा धावबाद झाला आहे. याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बंगळुरू वन डेपासून झाली होती, ज्यात रोहितने पहिल्यांदाच द्विशतक ठोकले होते.