भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे फक्त या दोन देशांमध्येच नाही, तर जगभरातल्या क्रिकेट प्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय असतो. रविवारी आशिया चषक २०२३च्या सुपर फोरमधील लढतीत भारतानं केलेली सुरुवात याच उत्सुकतेला सार्थ ठरवणारी ठरली. रोहित शर्मा व शुबमन गिलनं भारताला १२१ धावांची तडाखेबंद सुरुवात करून दिल्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं टॉस जिंकून आधी बॉलिंग करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर टीका होऊ लागली. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून जगभरातल्या फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या शोएब अख्तरनं यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
काय झालं रविवारी?
रविवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुपर फोर फेरीचा सामना सुरू झाला. मात्र, आधीच अंदाज वर्तवण्यात आल्याप्रमाणे पावसानं हजेरी लावली आणि सामना अर्धवटच राहिला. पाऊस येण्याआधी भारतानं पहिली बॅटिंग करताना २ गड्यांच्या मोबदल्यात २४.१ षटकांमध्ये १४७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहली व के. एल. राहुल भारताच्या डावाला आकार देत होते. मात्र, अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे खेळ थांबवला. पुढचे ४ तास न पडलेला पाऊस पुन्हा रात्री ९ च्या सुमारास सुरू झाला आणि खेळ राखीव दिवशी म्हणजे आज खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शोएब अख्तर म्हणाला, “पावसानं वाचवलं!”
दरम्यान, एकीकडे मैदानात पाऊस पडत असल्यामुळे सामना थांबला होता. सर्व क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडलं होतं. पण दुसरीकडे पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनं पावसानं पाकिस्तानला वाचवल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मैदानाबाहेर रेकॉर्ड केलेला व्हिडीओ शोएबनं आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला असून त्यात त्यानं बाबर आझमच्या निर्णयालाही लक्ष्य केलं आहे.
“मित्रांनो, मी सामना बघायला आलो होतो. आम्ही सगळे चाहतेही वाट बघत होतो. भारतीय व पाकिस्तानीही. पण अखेर पावसानं आज आम्हाला वाचवलं. त्या दिवशी पावसानं भारताला वाचवलं होतं. आज आम्ही भारतासमोर अडचणीत सापडलो असताना पावसानं आम्हाला वाचवलं. बरं झालं पाऊस आला”, असं शोएब अख्तरनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
“कोलंबोचा पाऊस म्हणजे वेडेपणा”
दरम्यान, कोलंबोत अचानक वेगाने आलेल्या पावसाचं वर्णन करताना शोएब अख्तरनं आपल्या ट्वीटमध्ये “मला वाटत नाही आज (रविवारी) खेळ पुन्हा सुरू होईल. कोलंबोमध्ये वेड्यासारखा पाऊस पडतो”, असं म्हटलं आहे.
बाबर आझमची अप्रत्यक्ष कानउघाडणी
दरम्यान, आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या बाबर आझमला शोएब अख्तरनं अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. “मला आशा आहे की हा सामना पूर्ण व्हावा. सोमवारी इथे खेळ व्हावा आणि बाबर आझमनं आधी बॉलिंग न करण्याचा निर्णय घ्यावा”, असं अख्तर या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.