टी-२० विश्वचषक स्पर्धेआधीच्या भारतीय संघाच्या शेवटच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना बुधवारी भारताने आठ गडी राखून जिंकला. एकतर्फी झालेल्या या सामन्यामध्ये भारतीय सलामीवीर के. एल. राहुल आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांनी नाबाद राहत अर्धशतकं झळकावली. सूर्यकुमारचं हे टी-२० मधील सलग दुसरं अर्धशतक ठरलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये शेवटच्या सामन्यातही त्याने दमदार खेळी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला होता. बुधवारीही याचा रिपीट टेलिकास्ट वाटतोय की काय अशी खेळी सूर्यकुमारने केली. या खेळीबरोबरच सूर्यकुमारने दोन अनोखे विक्रम आपल्या नावावर केले.

सूर्यकुमारने यावर्षीच्या म्हणजेच २०२२ च्या टी-२० सामन्यांमध्ये ७०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये टी-२० सामन्यांत ७०० धावांचा पल्ला ओलांडणारा सूर्यकुमार हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने २०१८ साली शिखर धवनने केलेला ६८९ धावांचा विक्रम मागे टाकला आहे. सूर्यकुमारने केवळ हा विक्रम मोडीत काढलाय असं नाही तर त्याने ज्या सरासरीने धावा केल्या आहेत ती सुद्धा आश्चर्यकारक आहे. त्याने १८० च्या स्ट्राइक रेटने आणि प्रत्येक सामन्याला ४० धावांच्या सरासरीने हा ७०० धावांचा पल्ला गाठला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिरुवनंतपुरममधील पहिल्या टी-२० सामन्यात चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार फलंदाजीसाठी आला तेव्हा सातव्या षटकामध्ये भारताची धावसंख्या १७ धावांवर दोन गडी बाद अशी होती. आल्या आल्या त्याने दोन उत्तुंग षटकार लगावले आणि भारतीय संघाची धावगती वाढली. सामना संपताना तो नाबाद राहिला. तीन षटकं बाकी असतानाच भारताने १०७ धावांचं माफक लक्ष्य गाठलं. सूर्यकुमारने ३३ चेंडूंमध्ये ५० धाव्या केल्या. या खेळीबरोबरच २०२२ मधील सूर्यकुमारच्या नावावरील धावांची संख्या ७३२ इतकी झाली आहे.

रिझवानचा विक्रम मोडला…
सामन्याच्या सुरुवातीलाच दोन उत्तुंग षटकार मारत सूर्यकुमारने आणखीन एक विक्रम स्वत:च्या नावे केला. सूर्यकुमारने एका वर्षात टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही मोडीत काढला. विशेष म्हणजे त्याने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानचा विक्रम मोडीत काढला. रिझवानने २०२१ मध्ये ४२ षटकार लगावले होते. मार्टीन गप्टीलचा २०२१ मधील ४१ षटकार लगावण्याचा विक्रम रिझवानने आपल्या नावावर केला होता. आता हा विक्रम सूर्यकुमारने मोडीत काढला.

२०२२ मध्ये सूर्यकुमारने आतापर्यंत ४५ षटकार लगावले आहेत. हा एक नवा विक्रम असून या वर्षभरामध्ये अजून तीन महिने बाकी असल्याने हा आकडा नक्कीच वाढणार आहे. सूर्यकुमारला रिझवानच्या षटकांच्या संख्येपेक्षा अधिक षटकार मारण्याचे आणि विक्रमातील अंतर अधिक वाढवण्याच्या बऱ्याच संधी आहेत. रिझवानने २६ सामन्यांमध्ये ४२ षटकार लगावले आहेत. तर सूर्यकुमारने हा विक्रम २१ खेळींमध्येच मोडून काढला आहे. सूर्यकुमार सध्या एमआरएफ टायर आयसीसी पुरुषांच्या टी-२० प्लेअर्स रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावावर ८०१ पॉइण्ट आहेत.