भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू झालेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यातील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात पाहुण्या आफ्रिकन संघाने सात गडी राखून भारताचा पराभव केला. डेव्हिड मिलर आणि रॅसी वॅन डेर डुसेनच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर आफ्रिकेला २१२ धावांचा यशस्वी पाठलाग करणे शक्य झाले. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध एवढ्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. त्यामुळे आजचा विजय त्यांच्यासाठी विशेष ठरला. पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकात चार गड्यांच्या बदल्यात २११ धावा केल्या होत्या. विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य घेऊन दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला होता. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्याच षटकात भुवनेश्वर कुमारने कर्णधार टेम्बा बावुमाला बाद केले. त्यानंतर सहाव्या षटकात हर्षल पटेलने ड्वेन प्रिटोरियसला त्रिफळाचित केले. त्यापाठोपाठ नवव्या षटकात क्विंटन डी कॉकला बाद करून अक्षर पटेलने भारतीय संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवले होते.
दरम्यान, आवेश खानने टाकलेल्या १५व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर श्रेयस अय्यरने डीप मिडविकेटजवळ डुसेनचा झेल सोडला. अय्यरची ही चूक भारताला फार महागात पडली. त्यानंतर जीवनदान मिळालेल्या डुसेन आणि डेव्हिड मिलरच्या जोडीने तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाकडे नेले. आफ्रिकेने भारताने विजयासाठी दिलेले लक्ष्य १९.१ षटकांत पूर्ण केले. डुसेन ७५ आणि मिलर ६४ धावांवर नाबाद राहिले. ३१ चेंडूत सहा षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा करणाऱ्या मिलरला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या पॉवरप्लेमध्ये ५१ धावा जमवल्या. सातव्या षटकात वेन पार्नेलने ऋतुराज गायकवाडला बाद केले. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशनने धावफलक हलता ठेवला. सलामीवीर ईशानने धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. त्याचा जम बसलेला असताना १३व्या षटकात केशव महाराजच्या चेंडूवर तो बाद झाला. ईशान किशनने ४८ चेंडूंमध्ये ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर १७व्या षटकात श्रेयस अय्यर आणि शेवटच्या षटकात कर्णधार ऋषभ पंत बाद झाला. उपकर्णधार हार्दिक पंड्या ३१ आणि दिनेश कार्तिक १ धावावर नाबाद राहिले.
आजचा सामना जिंकून भारतीय संघाला सलग १३ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र, मिलर आणि डुसेन या आफ्रिकन जोडीच्या झंझावातामुळे भारताचे विश्वविक्रमाचे स्वप्न धुळीला मिळाले.