India vs South Africa 1st Test Match: माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी शुबमन गिलच्या पहिल्या कसोटीतील खराब फलंदाजीवर टीका केली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत शुबमन गिल दोन धावा करून बाद झाला. पावसाने प्रभावित झालेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने आठ गडी गमावून २०८ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत के.एल. राहुल आणि मोहम्मद सिराज तंबूत नाबाद परतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याच्या पहिल्या दिवशी गिल लवकर बाद झाल्यानंतर संजय मांजरेकर नाराज झाले, त्यांनी त्याच्या फलंदाजीवर टीका केली. ते म्हणाले, “त्याला (शुबमन गिल) संघातील खेळाडूंच्या स्पर्धेत खूप धावा करत राहावे लागेल. संघातील प्रतिस्पर्ध्याबरोबर त्यांची नेहमीच तुलना होत राहील. शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संघर्ष करावा लागला आहे. आतापर्यंत त्याने या क्रमांकावर कसोटीत ४७ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने भारताकडून कसोटीत पदार्पण केल्यापासून गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण परिस्थितीतील या बदलाचा फायदा या युवा फलंदाजाला झालेला नाही.”

हेही वाचा: IND vs SA 1st Test: सेंच्युरियनमध्ये सामन्यापूर्वी चक्क राहुल द्रविडने केली गोलंदाजी, सोशल मीडियायवर Video व्हायरल

मांजरेकर पुढे म्हणाले, “संघातील कामगिरी आणि प्रचंड स्पर्धा यामुळे गिलला संघातील स्थान पक्के करण्यासाठी मोठी धावसंख्या करावी लागेल. जैस्वाल संघात आपला ठसा उमटवण्यात काही प्रमाणात यशस्वी होत असल्याने गिल सलामीला रोहित शर्माबरोबर फलंदाजी करण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या डावात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुबमन गिलला लवकर खेळपट्टीवर यावे लागले.”

विक्रम राठौर यांनी लोकेश राहुलचे कौतुक केले

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. लवकर विकेट्स पडल्यामुळे आणि धावा न झाल्याने त्रस्त असलेल्या भारतीय संघासाठी राहुलने अर्धशतक झळकावले. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी के.एल.च्या या खेळीचे कौतुक केले आहे. सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १०७ धावांवर ५ विकेट्स गमावल्या. त्यानंतर के.एल. राहुलने डावाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आपल्या अप्रतिम कामगिरीची पुनरावृत्ती केली. यावेळी, विक्रम राठौर यांनी त्याला भारताचा ‘संकट मोचक’ म्हणून नाव दिले आहे.

हेही वाचा: IND vs SA 1st Test: “भारताला अजून…” पहिल्या दिवसाच्या खेळानंतर सुनील गावसकरांनी टीम इंडियाला दिला मोलाचा सल्ला

विक्रम राठौर यांनी लोकेश राहुलचे कौतुक करताना म्हटले की, “त्याने जे आधी केले आहे तेच तो आता करतो आहे. यात फरक फक्त इतकाच आहे की तो आता मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करत आहे.” राठोड सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, “तो आमच्यासाठी संकट मोचक ठरत आहे. जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा तो बहुतेक वेळा तिथे असतो. तो अशी परिस्थिती हाताळतो.”

या सामन्यात के.एल. राहुलने मिडल ऑर्डर मध्ये येत खालच्या फळीतील फलंदाजांसह महत्त्वपूर्ण भागीदारी केली, जी संघासाठी किफायतशीर ठरली. रोहित, गिल, अय्यर आणि विराटसारख्या मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर केएल आणि शार्दुल ठाकूर यांनी ४३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हाही राहुल १०५ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांवर नाबाद होता. मात्र, पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर आटोपला. दरम्यान, विराट कोहली (३८) आणि श्रेयस अय्यर (३१) यांनीही महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने ८ गडी गमावून २०८ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 1st test sanjay manjrekar criticized shubman gill after poor batting avw
Show comments