India vs South Africa 1st Test Match: सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशीही दक्षिण आफ्रिकेने भारतावर वर्चस्व कायम राखले. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कागिसो रबाडाने कर्णधार रोहित शर्माला शून्य धावांवर बाद करून भारताच्या दुसऱ्या डावात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या काळात रबाडाने आपल्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला आहे.
कागिसो रबाडाने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण केले आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा केवळ पाचवा गोलंदाज आहे. रबाडाने रोहितला शून्यावर बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवून ही कामगिरी केली आहे. याआधी वेगवान गोलंदाज डेल स्टेन, मॉर्न मॉर्केल, अॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलॉक यांनी ही कामगिरी केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला दुसऱ्या डावातही बॅकफूटवर ढकलले आहे. सलामीवीर रोहित शर्मा वर्षातील शेवटच्या डावात भोपळाही फोडू शकला नाही. भारताच्या पहिल्या डावात कागिसो रबाडाने रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते आणि दुसऱ्या डावातही रबाडाने रोहितला क्लीन बोल्ड केले. रबाडाने आपल्या कसोटी कारकिर्दीत ८ डावात ७ वेळा रोहित शर्माला बाद केले आहे.
रोहित शर्मा आणि कागिसो रबाडा यांच्यातील या लढतीत रबाडाचा वरचष्मा राहिला आहे. रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १४ वेळा रोहित शर्माला बाद केले आहे. आतापर्यंत रोहित शर्मा सर्वाधिक वेळा कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने रबाडाविरुद्ध १०४ धावा केल्या असून ७ वेळा त्याचा बळी ठरला आहे.
रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज
कागिसो रबाडा- १४
टिम साउथी – १२
अँजेलो मॅथ्यूज – १०
नॅथन लिऑन – ९
ट्रेंट बोल्ट – ८
हेही वाचा: IND vs SA 1st Test: “जागे व्हा…”, टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर सुनील गावसकर यांनी केले सूचक विधान
पहिल्या डावात भारतीय संघ २४५ धावांत गारद झाला होता. के.एल. राहुलने सर्वाधिक १०१ धावा केल्या. या कालावधीत कागिसो रबाडाने १४ वेळ पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. डीन एल्गरच्या १८५ आणि मार्को जेन्सनच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४०८ धावा केल्या, त्यामुळे १६३ धावांची आघाडी झाली. डेव्हिड बेडिंगहॅमने ५६ धावा केल्या. टोनी-डी-जॉर्जी २८ आणि गेराल्ड कोएत्झी १९ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.