India vs South Africa 1st Test Match: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी रोहित शर्मा अँड कंपनीवर टीका केली आहे. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताच्या गोलंदाजांच्या कामगिरीने भारताचा माजी महान खेळाडू निराश दिसला. सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला जागे होण्याचा सल्ला दिला आहे.
डीन एल्गरने भारतीय क्रिकेट संघाला घाम काढला असून त्याने १८५ धावा करत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत नेले आहे. मार्को जॉन्सनला बाद करण्यातही टीम इंडियाला अपयश आले आणि दोघांनी ५० धावांची भागीदारी केली. खराब क्षेत्ररक्षण आणि उत्साहाचा अभाव यामुळे गावसकर यांनी कॉमेंट्री बॉक्समधूनच रोहित आणि टीम इंडियावर टीका केली आहे.
सुनील गावसकर त्यांच्या समालोचनात म्हणाले, “जागे व्हा आता तरी जागे व्हा! टीम इंडियाने आतातरी जागे व्हायला हवे. रोहित अँड कंपनीचे खांदे पडलेले दिसत आहेत. मी दुसऱ्या दिवसाच्या चहापानानंतर एक तास समजू शकतो, तो दिवस वेगळा होता, परंतु आजचा दिवस नवीन होता आणि दिवसाच्या पहिल्या तासात संघात जोश दिसला नाही.” नंतर रवी शास्त्री देखील म्हणाले, “भारताने त्यांच्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज स्वतः हून चुका करतील किंवा काही घडेल याचा विचार करणे थांबवले पाहिजे. संघाला सामन्यात परत येण्याची गरज आहे.”
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या दिवसाची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात २५६ धावा अशी होती. त्याने पहिल्या डावात ४०८ धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे आफ्रिकन संघाने पहिल्या डावात १६३ धावांची आघाडी मिळवली.
दक्षिण आफ्रिकेचा डाव संपला
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४०८ धावांवर संपला. जसप्रीत बुमराहने नांद्रे बर्गरला (००) क्लीन बोल्ड केले. त्याच्या बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेला नववा धक्का बसला. कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. त्याला रिटायर्ड हार्ट आऊट घोषित करण्यात आले. मार्को जॅनसेन ८४ धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने पहिल्या डावात सर्वाधिक १८५ धावा केल्या. मार्को जॅन्सनने नाबाद ८४ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने ५६ धावा केल्या. टोनी-डी-जॉर्जी २८ आणि गेराल्ड कोएत्झी १९ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.