India vs South Africa 2nd ODI Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१९ डिसेंबर) पार पडला. गकबेराह येथील सेंट जॉर्ज पार्क येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. या सामन्यात टोनी डी जॉर्जीने नाबाद शतक झळकावत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
ज्या खेळपट्टीवर भारतीय संघाचे फलंदाज अडखळताना दिसत होते, त्याच खेळपट्टीवर आफ्रिकेच्या फलंदाजांनी एकतर्फी लक्ष्याचा पाठलाग केला. आफ्रिकेसाठी सलामी देणाऱ्या टोनी डी जॉर्जी आणि रीझा हेंड्रिक्स यांनी १३० धावांची भागीदारी केली, जी २८ व्या षटकात हेंड्रिक्सच्या विकेटने मोडली. अर्शदीप सिंगने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रॅसी व्हॅन डर ड्युसेनने ५ चौकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली आणि टोनी डी जॉर्जीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची (83 चेंडू) भागीदारी केली. विजयाच्या काही क्षण आधी ४२ व्या षटकात रिंकू सिंगने भारतासाठी दुसरी विकेट घेतली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४६.२ षटकांत २११ धावांवर गारद झाला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने टोनी डी जॉर्जीच्या शतकाच्या आणि रीझा हेंड्रिक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ४२.३ षटकांत २ गडी गमावून २१५ धावा करत विजय नोंदवला. भारताकडून रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – IPL 2024 Auction : रिंकू सिंगकडून ५ चेंडूत सलग ५ षटकार खाणाऱ्या यश दयाळसाठी कोणी मोजले ५ कोटी? जाणून घ्या
भारताकडून साई सुदर्शनने ६२ आणि कर्णधार राहुलने ५६ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. आफ्रिकन संघाकडून नांद्रे बर्जरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. विल्यम्स-मार्करम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.