IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ९ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रविवारी रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी केशव महाराज सांभाळत आहे. महाराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका २७८ धावांपर्यंत मजल मारू शकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्विंटन डिकॉक (५) आणि मलान (२५) स्वस्तात माघारी परतले. १० षटकात ४० धावांवर दोन फलंदाज गमावल्यानंतर आफ्रिकेने सावध फलंदाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, एडेन मार्कराम आणि रीजा हेंड्रिक्सने भारताविरूद्ध मोठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. हेंड्रिक्सने आक्रमक रूप धारण करत पहिल्यांदा अर्धशतकी मजल मारली. त्यानंतर मार्करामने आपले अर्धशतक पूर्ण करत तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील तिसऱ्या गड्यासाठी १२९ चेंडूत १२९ धावांची शानदार भागीदारी रचली. मोहम्मद सिराजला अखेर ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने हेंड्रिक्सला ७४ धावांवर बाद केले. हेंड्रिक्स बाद झाल्यानंतर आलेल्या यष्टीरक्षक हेन्रिच क्लासेनने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुरा पडला. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने त्याला ३० धावांवर बाद करत आफ्रिकेला चौथा धक्का दिला.

कुलदीपने क्लासेनला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेला वॉशिंग्टन सुंदरने एडेन माक्ररमला बाद केले.  त्याने ८९ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. यानंतर डेव्हिड मिलर आणि पार्नेल खेळपट्टीवर आले. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकात टिच्चून मारा करत या दोघांना हात उघडण्याची संधी दिली नाही. शार्दुल ठाकूरने वेन पार्नेलला १६ धावांवर बाद करत आफ्रिकेला सहावा धक्का दिला.

हेही वाचा :   IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाच्या ताफ्यात नवा अष्टपैलू खेळाडू दाखल, आफ्रिकेविरुद्ध आजच्या सामन्यात केले पदार्पण

आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतासाठी अष्टपैलू शाहबाज अहमद याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत एक गडी बाद केला. शाहबाज अहमदचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे, पण भारतीय संघासाठी त्याला आज पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली. मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी करत १० षटकात १ निर्धाव षटक टाकत आणि ३८ धावा देत ३ गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत आफ्रिकेला शेवटच्या षटकात लगाम घालण्यास मदत केली.

भारताला या मालिकेत जिवंत राहण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे. कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देणे अपेक्षित आहे.