IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रांची येथे सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी केशव महाराज सांभाळत आहे. महाराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका २७९ धावांपर्यंत मजल मारू शकली.
कुलदीपने क्लासेनला बाद केल्यानंतर पुढच्याच षटकात आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेला वॉशिंग्टन सुंदरने एडेन मार्करामला बाद केले. त्याने ८९ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. यानंतर डेव्हिड मिलर आणि पार्नेल खेळपट्टीवर आले. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकात टिच्चून मारा करत या दोघांना हात खोलण्याची संधी दिली नाही. शार्दुल ठाकूरने वेन पार्नेलला १६ धावांवर बाद करत आफ्रिकेला सहावा धक्का दिला.
हेही वाचा : टी२० विश्वचषकासाठी मिसेस बुमराह ऑस्ट्रलियात पोहताच चाहत्यांकडून झाली ट्रोल
मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी करत १० षटकात १ निर्धाव षटक टाकत आणि ३८ धावा देत ३ गडी बाद केले. आफ्रिकेला शेवटच्या षटकात लगाम घालण्यास सिराज महत्त्वाचा ठरला. रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील तिसऱ्या गड्यासाठी १२९ चेंडूत १२९ धावांची शानदार भागीदारी रचली होती. मोहम्मद सिराजला अखेर ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने हेंड्रिक्सला ७४ धावांवर बाद केले. सिराजने एक अफलातून झेलही टिपला, परंतु एवढं सगळ करूनही तो ट्रोल होतोय. त्याला कारणही तसेच आहे.
मोहम्मद सिराज पंचांशी भिडला
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ४८ व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला. त्याने षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार केशव महाराजकडून फटका चुकला अन् चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनकडे गेला. संजूने तो लगेच सिराजकडे फेकला. नॉन स्ट्रायकरला उभा असलेला डेव्हिड मिलर पुढे आल्याचे लक्षात येताच सिराजने धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू स्टंप्सना न लागता तो सीमारेषेपलीकडे गेला. त्यानंतर सिराजने पंचांकडे डेड बॉलची मागणी केली, परंतु पंचांनी मागणी फेटाळून लावत बायचा म्हणजेच अतिरिक्त धावांचा इशारा केला आणि चार धावा आफ्रिकेला दिल्या. त्यावरून शिखर धवनने नाराजी व्यक्त केली. पंचांनी नियमावर बोट ठेऊन सिराजचा युक्तिवाद फेटाळून लावला.