IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी२० सामना आज २ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून गुवाहाटी येथील बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना आठ गडी राखत जिंकला असून आजच्या सामन्यात मालिका विजयाच्या इराद्याने रोहित सेना उतरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका भारताला आजपर्यंत मायदेशात जिंकता आलेली नाही त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला ही नामी संधी आहे.

आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन अंतिम अकरामध्ये काही बदल करू शकतात. खासकरून दुखापतीमुळे बाहेर पडलेला जसप्रीत बुमराह ऐवजी संघात निवड झालेल्या मोहम्मद सिराजला आजच्या सामन्यात हर्षल पटेल ऐवजी खेळण्याची संधी मिळू शकते. इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये त्याने सर्वोत्तम खेळ दाखवला. दीपक चहर आणि अर्शदीप सिंगला त्याच्यासोबत खेळण्याची संधी मिळू शकते. भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या खेळपट्ट्यांवर कहर करण्यासाठी सज्ज आहेत. अक्षर पटेल उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत असून तो किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. आगामी टी२० विश्वचषक तोंडावर आलेला असताना भारतीय संघाला अंतिम संघ ठीक करण्याची ही शेवटची संधी आहे.

हेही वाचा   :  T 20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा दिलासा; मोहम्मद शमी ठणठणीत, पाहा सरावाचा दमदार Video 

लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामी करताना दिसू शकतो. एकेरी आणि दुहेरी धावा करण्यात हे दोन्ही खूप माहीर असून  वेळ पडली तर मोठे फटके मारत आक्रमणपण करू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केएल राहुलने शानदार ५१ धावांची खेळी केली होती. विराट कोहली भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. सूर्यकुमार यादव २०२२ मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ५० धावा केल्या होत्या. आयपीएल२०२२ पासून दिनेश कार्तिकने भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा त्याच्याकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी देऊ शकतो. रोहित पंतला आजच्या सामन्यातून वगळू शकतो.

हेही वाचा   : इंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर चाहत्यांचा ‘राडा’; हिंसाचारात १७४ जणांचा मृत्यू  

हवामान आणि खेळपट्टी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी२० सामना बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे जिथे फलंदाजांसाठी धावा करणे खूप सोपे आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल जे गेल्या काही सामन्यांमध्ये आपण पाहत आहोत. त्यामुळे जो कुणी कर्णधार नाणेफेक जिंकेल तो पहिले क्षेत्ररक्षणाचा पर्याय स्वीकारेल. या मैदानावरचा इतिहास पाहता आतापर्यंत ६ एकदिवसीय आणि ४ टी२० सामने झाले आहेत आणि त्या सगळ्या सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे. आजच्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाशात आच्छादलेल्या ढगांमुळे आयोजक आणि चाहते चिंतेत पडले आहेत, कारण पावसामुळे या स्टेडियममधील मागील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना रद्द करण्यात आले होते. करोना महामारीनंतर गुवाहाटीमधला हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे, ज्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रॉसो, तबरेझ शम्सी

Story img Loader