India vs South Africa 2nd Test Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये पार पडला आहे. या सामन्यात भारताने आफ्रिकेवर सात विकेट्सनी ऐतिहासिक विजय नोंदवला. कारण केपटाऊनमध्ये टीम इंडिया पहिली आशियाई टीम आहे, जिने आफ्रिकेला हरवले आहे. त्याचबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने ३१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला आहे. कारण १९९३ नंतर प्रथमच भारतीय संघाला येथे विजय मिळवता आला आहे. म्हणजेच येथील विजयाची तीन दशकांची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय संघाने २ जानेवारी १९९३ रोजी येथे पहिली कसोटी खेळली आणि ती हरली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. त्यानंतर प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या ९८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांत गारद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे टीम इंडियाने १२ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.

भारताचा ऐतिहासिक विजय –

केपटाऊन कसोटी जिंकून भारताने इतिहास रचला. भारताने येथे प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. केपटाऊनमध्ये भारताचा हा सातवा कसोटी सामना होता. यापूर्वी सहापैकी चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन सामने अनिर्णित राहिले होते. भारताने केपटाऊन कसोटी जिंकून मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका अनिर्णित करण्यात भारताला यश मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१०-११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली होती.

हेही वाचा – Ind vs SA: केपटाऊनच्या खेळपट्टीला आयसीसी काय रेटिंग देणार? डिमेरिट पॉइंट काय असतात?

दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. यशस्वीच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. तो २३ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्याने सहा चौकार मारले. आंद्रे बर्गरच्या चेंडूवर तो ट्रिस्टन स्टब्सकरवी झेलबाद झाला. भारताला दुसरा धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला. तो ११ चेंडूत १० धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला क्लीन बोल्ड केले. शुबमनने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. विराट कोहली बाद होणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. तो ११ चेंडूत १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्को यान्सनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक काइल वेरेयनने झेल घेतला. रोहित शर्मा १७ आणि श्रेयस अय्यर ४ धावा काढून नाबाद परतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 2nd test india registered a historic seven wicket win over africa in cape town vbm