India vs South Africa 2nd Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्या सामन्याआधी इरफान पठाणने भारतीय संघाला सल्ला दिला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत येथे एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. ते सहा सामने खेळले आहेत आणि चार गमावले आहेत. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी गमावल्यानंतर भारत मालिकेत ०-१ने पिछाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्याकडे संघाचे लक्ष आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने संघात काही बदल सुचवले आहेत. रविचंद्रन अश्विनच्या जागी भारताने रवींद्र जडेजाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करावा अशी त्याची इच्छा आहे. पठाणने स्टार स्पोर्ट्सवरील एका मुलाखतीत सांगितले की, “जर रवींद्र जडेजा तंदुरुस्त असेल तर त्याने संघात पुनरागमन केले पाहिजे. अश्विनने त्या खेळपट्टीवर त्याच्याकडून अपेक्षा केल्याप्रमाणे चांगली गोलंदाजी केली, पण सेंच्युरियनमध्ये ७व्या क्रमांकावर फलंदाज म्हणून जडेजाची उणीव भासत होती. रोहित शर्मा यावर नक्की विचार करेल.”

हेही वाचा: AUS vs PAK: निवृत्तीनंतर वॉर्नरचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “काही कीबोर्डच्या मागे लपतात तर काही एकत्र बिअर…”

मुकेशला संधी द्यावी: इरफान पठाण

पठाण म्हणाला, “तुम्ही रोहित शर्मा असाल आणि तुम्हाला त्याच गोलंदाजीवर जायचे असेल तर तेही ठीक आहे. पण जर तुम्ही बदल करण्याचा विचार करत असाल तर मुकेश कुमार प्रसिध कृष्णाची जागा घेऊ शकतात. प्रसिधला आत्मविश्वास वाटत असेल तर त्याला दुसऱ्या कसोटीत कायम ठेवायला हवे.

केपटाऊनमध्ये भारतीय संघाची कामगिरी

२०१८ आणि २०२२ साली केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी खराब होती. या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाने चार डाव खेळले आणि सर्वोच्च धावसंख्या केवळ २२३ धावांची होती. २०१८ मध्ये भारताने २०९ आणि १३५ धावा केल्या, तर २०२२मध्ये त्यांनी २२३ आणि १९८ धावा केल्या. यावरून येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी सोपी राहणार नसल्याचे दिसून येते. २०२२मध्ये विराट कोहलीने येथे ७९ धावांची खेळी खेळली आणि जसप्रीत बुमराहने एका डावात पाच विकेट्स घेतल्या, परंतु कीगन पीटरसनच्या खेळीमुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.

दक्षिण आफ्रिकेतील यश मुख्यत्वे सलामीच्या जोडीवर अवलंबून आहे, जे काम रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सेंच्युरियनमध्ये करण्यात अपयशी ठरले. दोघांनी केवळ १३ आणि ५ धावांची भागीदारी केली. पहिल्या सामन्यात भारताचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला. न्यूलँड्स येथेही गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय जोडीची कामगिरी वाईट होती. २०१८ साली मुरली विजय आणि शिखर धवन यांनी १६ आणि ३० धावांची भागीदारी केली, २०२२मध्ये के.एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी ३१ आणि २० धावांची भागीदारी केली होती.

हेही वाचा: David Warner: डेव्हिड वॉर्नरने त्याच्या कारकीर्दीतील निवडला सर्वात घातक गोलंदाज, कोण आहे तो? जाणून घ्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, के.एस. भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर. मार्को जॉन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 2nd test irfan pathan advises team india to get ravindra jadeja chance in 2nd test against south africa avw
Show comments