India vs South Africa 2nd Test Match, Harbhajan Singh: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला आहे. हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूंमध्ये पूर्ण झालेला लहान सामना ठरला आहे. दरम्यान, हरभजन सिंगने विश्वचषकातील खेळपट्ट्यावर ‘खराब खेळपट्टी’ असे ताशेरे ओढणाऱ्या आयसीसीची खरडपट्टी काढत केप टाऊन खेळपट्टीच्या रेटिंगबद्दल प्रश्न विचारले आहेत.
भारताच्या माजी फिरकीपटू हरभजनने मालिकेतील दुसरा कसोटी सामना ७ गडी राखून जिंकल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. त्याने खेळपट्टीच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हरभजनने ट्वीटर ट्वीट केले की, “दुसरा कसोटी सामना जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना दोन दिवसात संपला. आयसीसी, केप टाऊनच्या या खेळपट्टीचे रेटिंग काय असेल? वाईट? सरासरी? किंवा काय?” असे म्हणत टोमणा मारला आहे. याआधी त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले होते की, “आयसीसीने मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातील खेळपट्टयांवर खराब रेटिंग देत ताशेरे ओढले होते. आता या सेना (दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड) देशांमधील खेळपट्टयांबद्दल आयसीसी काय बोलणार हे, आम्हाला पाहायचे आहे.”
केप टाऊन कसोटी सामना ६४२ चेंडूत संपला
केपटाऊनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना अवघ्या ६४२ चेंडूत संपला. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी १-१ डाव पूर्ण केला होता. तर तिसऱ्या डावाची सुरुवातही पहिल्या दिवसासारखीच झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांत गुंडाळला गेला आणि भारताला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य मिळाले.
दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा मालिका अनिर्णित
दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर दुसऱ्यांदा कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात भारतीय संघाला यश आले. गेल्या वेळी २०१०-११मध्ये असे घडले होते. त्यावेळी महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता. टीम इंडियाने पहिली कसोटी हरल्यानंतर दुसरी जिंकली आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला. आता आफ्रिकेत मालिका अनिर्णित ठेवणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार ठरला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्या सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. केप टाऊनमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी यजमान संघाचा पराभव केला. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासारखे कर्णधार जे करू शकले नाहीत, ते रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली केले. कर्णधार म्हणून त्यांच्यापैकी कोणालाही येथे विजय मिळवता आलेला नाही.
भारताने हे लक्ष्य १२ षटकांत ७ गडी राखून पूर्ण केले. त्यानंतर हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना ठरला आहे. केप टाऊनच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी भरपूर विकेट्स घेतल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनीही आपापल्या ५ विकेट्स पूर्ण केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग–११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (यष्टीरक्षक), मार्को यान्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.