भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात १७ षटकात २ बाद ५७ धावा केल्या. आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर राहुल-मयंक पुन्हा अपयशी ठरले. भारताकडे आता ७० धावांची आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर आटोपला. कीगन पीरसनने झुंजार फलंदाजी करत ७२ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने तिखट मारा करत ५ बळी टिपले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा दुसरा डाव

भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज जानसेनने त्याला १० धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. तर मयंक अग्रवाल (७) धावांवर कगिसो रबाडाचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी संघाला अर्धशतक गाठून दिले. दुसऱ्या दिवसअखेर विराट १४ तर पुजारा ९ धावांवर नाबाद आहे.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला (३) लवकर तंबूत पाठवत भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या दिवसअखेर एडन मार्कराम आणि नाईट वॉचमन केशव महाराज नाबाद होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच बुमराहने सुरेख पद्धतीने मार्करामचा (८) त्रिफळा उडवला. संघाचा अर्धशतकी पल्ला गाठण्यापूर्वी केशव महाराजही (२५) उमेश यादवच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर कीगन पीटरसन आणि रुसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाला सावरलं. या दोघांनी संयमी भागीदारी रचत संघाचे शतक फलकावर लावले. उमेश यादवने ड्यूसेनला (२१) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या टेंबा बावुमाने पीटरसनला थोडी साथ दिली. पीटरसनने आपले अर्धशतक पूर्ण करत एका बाजूला किल्ला लढवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आधी बावुमाला आणि त्यानंतर काइल वेरेनला बाद करत आफ्रिकेला अजून संकटात टाकले. १५९ धावावर यजमानांनी ६ फलंदाज गमावले. तर बुमराहने जानसेनची दांडी गूल करत आफ्रिकेला सातवा धक्का दिला. बुमराहने ड्यूसेनला पुजारावकरवी झेलबाद करत आफ्रिकेची आशा संपुष्टात आणली. ड्युसेनने ९ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. त्यानंतर बुमराहने एनगिडीला बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव ७६.४ षटकात २१० धावांवर संपुष्टात आणला. बुमराहने ४२ धावांत ५ बळी घेतले. तर शमी आणि उमेश यादवला प्रत्येकी २ बळी मिळाले.

भारताचा पहिला डाव

विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचं अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (१२) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (१५) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने ७ चौकारांसह ४३ तर रहाणेने ९ धावा केल्या. चहापानापर्यंत भारताने ५४ षटकात ४ बाद १४१ धावा केल्या. चहापानानंतर भारताने पंतच्या रुपात आपला पाचला फलंदाज गमावला. जानसेनने त्याला बाद केले. दरम्यान विराटने संयमी अर्धशतक फलकावर लावले. १६७ धावांत भारताने ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. विराटने आक्रमक पवित्रा धारण करत झटपट धावा जोत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. तो आज शतकाचा दुष्काळ संपवणार असे वाटत असताना बाद झाला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर विराटला रबाडाने तंबूत धाडले. विराटने २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एक षटकारासह ७९ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला. पहिल्या डावात भारताने ७७.३ षटकात सर्वबाद २२३ धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने ४, जानसेनने ३ बळी घेतले. लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

हेही वाचा – PCB अध्यक्ष रमीझ राजांचा ‘मास्टरप्लॅन’; दरवर्षी भिडणार भारत आणि पाकिस्तान!

दोन्ही संघांमधील मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. यावेळी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाला आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत त्यांना प्रथमच येथे कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव</p>

दक्षिण आफ्रिका – डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 3rd test day 2 live updates adn
Show comments