IND vs SA 4th T20 Playing 11 & Pitch Report : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा टी २० आंतरराष्ट्रीय सामना आज (१७ जून) राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आजचा सामना भारतीय संघाने गमावला तर मालिकादेखील हातातून जाईल.
आजच्या सामन्यात भारताचा कर्णधार ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. आवेश खानच्या जागी अर्शदीप सिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. आवेश खानला या मालिकेत आतापर्यंत तीनवेळा संधी देण्यात आली. मात्र, त्याला अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नाही. आवेशने या मालिकेत आतापर्यंत ११ षटके टाकली आणि ८७ धावा दिल्या. या दरम्यान त्याला एकही बळी मिळवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे त्याला बाहेर ठेवले जाण्याची जास्त शक्यता आहे.
हेही वाचा – क्रिकेट खेळणाऱ्या मुलींची संख्या वाढेल!; सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाचे मत
याशिवाय, जर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक संघात परतला तर रीझा हेंड्रिक्सला बाहेर बसवले जाऊ शकते. डी कॉकच्या हाताला झालेली दुखापत लक्षात घेता हेनरिक क्लासेन यष्टीरक्षण करू शकतो.
राजकोटमध्ये खेळाडूंना सामन्यादरम्यान आर्द्रतेचा त्रास सहन करावा लागणार आहे. राजकोटमध्ये पावसाची शक्यता नसली तरी आकाश ढगाळ राहील. दिवसाचे तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत तर रात्रीचे तापमान ३० अंशांपर्यंत असेल. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असल्याचे सांगितले जाते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १८३ आहे. याठिकाणी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी दोनवेळा धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही नाणेफेकीला महत्त्व असणार आहे.
संभाव्य भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग/आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.
संभाव्य दक्षिण आफ्रिका संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक/रिझा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रॉसी व्हेन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेज शम्सी.