IND vs SA 5th T20 Playing 11 & Pitch Report : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान सुरू असलेली पाच सामन्यांची टी २० मालिका रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. त्यामुळे पाचवा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना आज (१९ जून) बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका आपल्या खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ आज प्रयत्नशील राहतील.
आज दिवसभर बंगळुरूतील तापमान २३ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८४ टक्के असण्याची शक्यता आहे. संध्याकाळी वाऱ्याचा वेग ताशी १४ किलोमीटर असेल. आजच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता ६८ टक्के आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या लढतीत दोन्ही संघासाठी पाऊस व्हिलन ठरू शकतो.
दरम्यान, एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. ही खेळपट्टी दोन्ही डावात फलंदाजांना मदत करेल. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला फारशी मदत मिळत नाही मात्र, मधल्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाज फायद्याचे ठरू शकतात. मैदानाचा आकार लहान असल्याने येथे मोठ्या धावसंख्येचा सामना बघायला मिळू शकतो.
हेही वाचा – ऑलिम्पिक विजेत्या नीरजला सुवर्णपदक
त्याचबरोबर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाची येथील कामगिरी उत्कृष्ट आहे. दुसऱ्या डावात धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाने ६० टक्के सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यालाच प्राधान्य देईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
असे असतील संभाव्य संघ –
भारत संभाव्य संघ : ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, मार्को यान्सन, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेज शम्सी, लुंगी एनगिडी.