IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत आहेत. या सामन्यात कुठल्या ११ खेळाडूंसह उतरायचं याचं आव्हान दोन्ही संघांसमोर आहे. तत्पूर्वी आफ्रिकी संघाचा कर्णधार टेंबा बावुमा याची खास प्रतिक्रिया समोर येत आहे. बावुमाच्या मते भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी मालिकेत आफ्रिकी संघासाठी घातक ठरू शकतो.
कर्णधार टेंबा बावुमाला असेही वाटते की, भारतीय खेळपट्टीवर नवीन चेंडूचा सामना करणे दक्षिण आफ्रिका संघासाठी सोपे नसेल. तो पुढे म्हणाला की, “नवीन चेंडूसह पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांचा सामना करणे सोपे नसेल. ते चेंडू स्विंग करू शकतात. हे फलंदाजीसाठी एक आव्हान आहे, ज्याचा सामना करण्यासाटी तुम्हाला स्वतःच्या फलंदाजीतील तंत्रज्ञान दाखवावे लागेल. संघाचे अधिक नुकसान न होता कमीत कमी गडी गमावणे, हे प्रमुख लक्ष्य असेल. असे असले तरी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह नेहमीच नवीन चेंडूने कडवे आव्हान देतात.”
दरम्यान, भुवनेश्वर कुमार या मालिकेत विश्रांतीवर असल्यामुळे आफ्रिकी संघाची चिंता काही प्रमाणात कमी होईल. भारतीय संघात सध्या जसप्रीत बुमराहसोबत उमेश यादव, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला गेला आहे. दक्षिण आफ्रिका हा असा संघ आहे ज्याने आतापर्यंत भारतात भारताविरुद्ध एकही टी२० मालिका गमावलेली नाही. आफ्रिका संघ जून महिन्यात भारतात आला होता. ही मालिका २-२ अशा बरोबरीत सुटली होती. यावेळी मात्र दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाला भारतात खेळण्याची भीती वाटत आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबतचे वक्तव्य केले.