भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ओमायक्रॉनचे संकट पाहता तिकीटांची विक्री केलेली नाही.

वृत्तानुसार, या सामन्यासाठी काही प्रतिनिधींना मैदानावर जाण्याची परवानगी दिली जाईल. दक्षिण आफ्रिकेतील कोविड-१९ निर्बंधांमुळे दोन हजार लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेदरम्यान दोन हजार प्रेक्षकांना मैदानावर जाण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती. तेव्हा ओमायक्रॉनच्या प्रकरणात घसरण आली, तर दर्शकांची संख्या वाढेल असे सांगण्यात आले.

हेही वाचा – VIDEO : ऋषभ पंतला मिळाली आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांनी केला फोन आणि म्हणाले…

स्टेडियमच्या ट्विटर हँडलवर माहिती देण्यात आली आहे, की दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात इम्पीरियल वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षक येतील की नाही हे सध्या स्पष्ट नाही. या संदर्भात पुढील घोषणा करण्यात येईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेल्या भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी येथे सराव सुरू केला आहे. आफ्रिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाला मुंबईत क्वारंटाइन करण्यात आले होते.

भारतीय संघ आठव्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. जगातील हा एकमेव देश आहे जिथे भारतीय संघ अजूनही कसोटी मालिका जिंकलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेली टीम इंडिया यावेळी नक्कीच इतिहास रचेल, अशी सर्वांना आशा आहे.
भारतीय संघाला येथे ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर ३ वनडे सामन्यांची मालिकाही सुरू होईल. भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर आहे. रोहित बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये रिहॅब प्रक्रियेत व्यस्त आहे.

Story img Loader