IND vs SA: भेदक गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० नं आघाडी घेतलीय. टी२० मालिकेतील या विजयामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने माजी कर्णधार एमएस धोनी याचा मोठा विक्रम मोडला आहे.
विराट कोहलीला जे जमलं नाही ते रोहित शर्माने करून दाखवले. तो भारताचा टी२० प्रकारातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरत आहे. त्याने मागील अनेक मालिकांमध्ये भारताला विजय मिळवून दिले आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय त्याच्यासाठी खास ठरला आहे. एकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणारा भारतीय कर्णधार हा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला मागे टाकले आहे. धोनी आता एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणारा भारतीय कर्णधार या यादीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
हेही वाचा : IND vs SA: टी२० क्रमवारीत सुर्यकुमार यादवचे प्रमोशन, रोहित-विराटचे एक पाऊल पुढे
कोहली पायउतार झाल्यानंतर भारतीय कर्णधार म्हणून रोहितने जबाबदारी स्वीकारली. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर २०२२ मधील १६वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय ठरला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने २०१६ मध्ये भारतीय कर्णधार म्हणून १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकले होते. त्यावर्षी टी२० विश्वचषक खेळला गेला. तसेच यावर्षीही टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे, मात्र यावर्षी आशिया चषकामध्ये भारताने टी२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये चार सामन्यांत भारताचे नेतृत्व रोहितने केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात नाणेपेक जिंकून रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं २० षटकात ८ गडी गमावून १०६ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंहनं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर, दीपक चाहर आणि हर्षल पटेलने प्रत्येकी दोन- दोन गडी बाद केले. तर, अक्षर पटेलला एक बळी मिळाला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलनं अर्धशतकी खेळी केली.