India vs South Africa 3rd T20 Match: गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेवरील टी-२० मधील वर्चस्व धोक्यात आले आहे. दुसरा टी-२० गमावल्यानंतर ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाविरुद्ध गुरुवारी तिसरा आणि अंतिम सामना जिंकणे आवश्यक आहे. हा सामना जिंकून भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता येणार आहे. जर हा सामना गमावला तर आठ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया टी-२० मध्ये पराभूत होईल. दक्षिण आफ्रिकेने २०१५-१६ मध्ये भारतात शेवटची टी२० मालिका २-० ने जिंकली होती. आतापर्यंत भारताने आफ्रिकेत तीन सामन्यांची एकही टी-२० मालिका गमावलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोलंदाजांनी कामगिरीने निराश केले

गकेबरहा येथील सेंट जॉर्जेस पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांची दयनीय कामगिरी झाली. अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार या दोघांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. दोघांनी १५.५० आणि ११.३३ धावा प्रति षटकाच्या इकॉनॉमीने धावा दिल्या. वडिलांची तब्येत खराब असल्याने दीपक चहर खेळत नव्हता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-२० मध्ये अर्शदीपने शानदार अंतिम षटक टाकले, पण त्यांच्यात सातत्याचा अभाव होता. एक वर्ष चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० खेळणारा रवींद्र जडेजा दुसऱ्या टी-२०मध्येही स्वतःची लय शोधताना दिसला. अंतिम सामन्यात त्याला चांगला फॉर्म साधावा लागेल. मुकेशला त्याचा वेग आणखी वाढवण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने निश्चितपणे चार विकेट्स घेतल्या, पण प्रति षटक ९.१२ धावाही दिल्या.

हेही वाचा: Sports Award: अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस, खेलरत्न अवार्डच्या शर्यतीत बॅडमिंटनपटू सात्विक-चिराग

सलामीच्या जोडीला चांगली सुरुवात करावी लागेल

सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांना दुसऱ्या सामन्यात खेळपट्टीच्या उसळीशी जुळवून घेता आले नाही. दोन्ही फलंदाज खाते न उघडताच बाद झाले. भारताला मालिकेत जर बरोबरी साधायची असेल तर सलामीच्या जोडीने धावा करणे आवश्यक आहे. ऋतुराज गायकवाड आजारी आहेत. जर तो ठीक असेल तर त्याला सामन्यात संधी दिली जाऊ शकते. याशिवाय जितेशच्या जागी इशान किशन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळू शकतो. त्याचबरोबर तिलकच्या जागी श्रेयस अय्यरला तर कुलदीपच्या जागी रवी बिश्नोईला संधी दिली जाऊ शकते.

चांगली बाब म्हणजे या मैदानावर भारताची कामगिरी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली झाली आहे. भारताने या मैदानावर चार टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तीन जिंकले आहेत आणि एक पराभव झाला आहे. यानंतर विश्वचषकाच्या तयारीसाठी दोन्ही संघांकडे फक्त चार टी-२० सामने शिल्लक आहेत.

रिंकूच्या षटकाराने मीडिया बॉक्सची काच फुटली

दुसऱ्या टी-२० मधील सकारात्मक बाजू म्हणजे रिंकू सिंग आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी शानदार  फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी ६८ आणि ५६ धावा करत अर्धशतकी खेळी केली. रिंकू सिंगचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले अर्धशतक होते. त्याच्या फलंदाजीने त्याने टी-२० विश्वचषकासाठी फिनिशर म्हणून आपला दावा मजबूत केला आहे. रिंकूने दुसऱ्या सामन्यात एवढा मोठा षटकार मारला की त्यामुळे मीडिया बॉक्सची काच फुटली.

हेही वाचा: Virat Kohli: विराटच्या थाळीत ‘शाकाहारी’ चिकन टिक्का, चाहत्यांनी केले आश्चर्य व्यक्त; नेमकं काय आहे प्रकरण?

कोएत्झी, जॅनसेन खेळणार नाहीत

भारत जेव्हा तिसरा सामना खेळेल तेव्हा त्यांना काहीसा मानसिक फायदाही मिळेल. दक्षिण आफ्रिकेचे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी, मार्को जॅनसेन आणि लुंगी एनगिडी (जखमी) या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाहीत. कोएत्झी आणि जॅनसेन कसोटी सामन्याच्या तयारीसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणार आहेत. टीम इंडियासाठी ही जमेची बाजू आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार एडन मार्करामने शानदार अष्टपैलू कामगिरी केली. रीझा हेंड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रेट्झके यांनी भारतीय वेगवान गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली होती.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११

भारत: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड/शुबमन गिल, तिलक वर्मा/श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा/इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव/रवी सिराजनो, कुलदीप यादव मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कहॅम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फेरेरा, अँडिले फेहलुकवायो, लिझाद विल्यम्स, ओटनीएल बार्टमन/नॅंद्रे बर्गर, तबरेझ शम्सी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa do or die for india today shreyas bishnoi to return to the team know the possible playing 11 avw
Show comments