India vs South Africa 2nd T20 Match: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला टी-२० पावसामुळे रद्द झाला, त्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या टी-२० मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक २०२४आधी भारतीय संघाचे फक्त काही टी-२० सामने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन योग्य संघ समतोल शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन या मालिकेसाठीही योजना तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दुसऱ्या टी-२०मध्ये भारताला आणखी काही खेळाडूंना आजमावण्याची संधी होती. त्यापैकी काही असे आहेत ज्यांनी गेल्या टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. असे असतानाही त्याला संधी देण्यात आली नाही. यामुळे चाहते संतप्त झाले असून त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या टी-२० मालिकेत शतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड आजारी पडल्यामुळे या सामन्यात खेळू शकला नाही. दुसरीकडे, श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांनाही संघात स्थान मिळालेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी श्रेयस अय्यर उपकर्णधार होता, तर रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. या दोघांना संघात का स्थान देण्यात आला नाही अनुपस्थितीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रानेही प्रतिक्रिया दिली आहे.
ट्वीटरवर पोस्ट करत आकाश चोप्रा म्हणाला, “अय्यर आणि बिश्नोईच्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती नाही, ते दुखापतग्रस्त आहेत? शेवटच्या मालिकेत अय्यर उपकर्णधार होता आणि बिश्नोई मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू होता. मला वाटतं मी काहीतरी विसरलोय?” याशिवाय शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाल्याचीही चाहत्यांनी खिल्ली उडवली. रिंकू सिंगच्या ६८ धावा आणि कर्णधार सूर्यकुमारच्या ५६ धावांच्या खेळीने टीम इंडिया अडचणीतून बाहेर पडली. मात्र, टीम इंडियाला हा सामना जिंकता आला नाही.
प्रथम फलंदाजी करताना भारताने १९.३ षटकांत सात गडी गमावून १८० धावा केल्या. सहा धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्या यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली. तिलक २९ धावा करून बाद झाला. त्याचबरोबर सूर्याने ३६ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. यानंतर जितेश शर्मा एक धाव काढून बाद झाला. उपकर्णधार रवींद्र जडेजा १४ चेंडूत १९ धावा करू शकला. रिंकूने ३९ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट १७४.३६ होता. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते. १९.३ षटकांनंतर पावसाने व्यत्यय आणला आणि सामना थांबवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने तीन विकेट्स घेतल्या. तर मार्को जॅनसेन, लिझाड विल्यम्स, शम्सी आणि मार्कराम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १३.५ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. रीझा हेंड्रिक्सने २७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली. मॅथ्यू ब्रिट्झकेने ७ चेंडूंत १६ धावा, कर्णधार मार्करामने १७ चेंडूंत ३० धावा, डेव्हिड मिलरने १२ चेंडूंत १७ धावा केल्या. त्याचवेळी, ट्रिस्टन स्टब्स १२ चेंडूत १४ धावा आणि फेहलुवूकवायो ४ चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला. भारताकडून मुकेश कुमारने दोन विकेट्स घेतल्या. सिराज आणि कुलदीपला प्रत्येकी एक विकेट मिळाली. मालिकेतील पुढील सामना १४ डिसेंबर रोजी होणार आहे.