केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या जुन्या शैलीत दिसला. तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान डीन एल्गरला आऊट न दिल्याने त्याने संताप व्यक्त केला. रवीचंद्रन अश्विनचा चेंडू एल्गरच्या पॅडला लागला. अंपायरने आऊट दिला, पण आफ्रिकन कर्णधाराने डीआरएस घेतला. तेथे निर्णय बदलण्यात आला. यावर कोहली चांगलाच संतापला होता. कोहलीच्या वागण्यावर टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे.
गौतम गंभीर म्हणाला, “विराट कोहली खूप अपरिपक्व आहे. भारतीय कर्णधारासाठी स्टम्पवर बोलणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. असा कॅप्टन तरुणांसाठी कधीही आदर्श बनू शकणार नाही.”
नक्की प्रकरण काय?
भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील २१ वे षटक टाकत होता. त्याचा चेंडू आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरच्या पॅडला लागला. अंपायरने त्याला आऊट दिला. एल्गरने सहकारी फलंदाज कीगन पीटरसनला विचारणा करून या निर्णयाला आव्हान दिले. रिप्लेमध्ये सर्व काही ठीक होते, परंतु हॉकआय तंत्राने चेंडू स्टम्पवरून जात असल्याचे दाखवले आणि एल्गर थोडक्यात बचावला. हे पाहून भारतीय खेळाडू आश्चर्यचकित झाले. पंचांनाही या निर्णयाचा धक्का बसला.
या घटनेनंतर विराट संतापला. तो स्टम्प माइकच्या जवळ गेला आणि म्हणाला, “तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा, फक्त विरोधी संघावर लक्ष केंद्रित करू नका. सर्वच लोकांना पकडण्याचा प्रयत्न करा.” यानंतर अश्विनने ब्रॉडकास्टरवर निशाणा साधला, तो म्हणाला, ”सुपरस्पोर्ट जिंकण्यासाठी अधिक चांगली पद्धत अवलंबली पाहिजे.” त्याचवेळी केएल राहुल म्हणाला, ”संपूर्ण देश ११ लोकांच्या विरोधात खेळत आहे.”