India vs South Africa 2nd Test Match: सेंच्युरियनमधील दारूण पराभवानंतर भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र, केपटाऊनमध्ये होणारी दुसरी कसोटी जिंकून संघाला मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे. भारताने १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबर कसोटी मालिका खेळण्यास सुरुवात केली. या ३१ वर्षांत भारतीय संघ न्यूलँड्स स्टेडियमवर सहा कसोटी सामने खेळला आहे, पण एकही सामना जिंकू शकलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाला केपटाऊनमध्ये चार पराभवांचा सामना करावा लागला असून दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. अशा स्थितीत या मैदानावर ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताला अविश्वसनीय कामगिरीची गरज आहे. विशेषत: कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीला दमदार सुरुवात करावी लागेल. गेल्या १२ वर्षात या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय सलामी जोडीने एकही शतकी भागीदारी केलेली नाही.

२०१८ आणि २०२२ मधील ही कामगिरी होती

२०१८ आणि २०२२ मध्ये येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी दयनीय होती. या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी चार डाव खेळले, परंतु टीम इंडियाची सर्वोच्च धावसंख्या केवळ २२३ एवढीच होती. २०१८ मध्ये भारताने २०९ आणि १३५ धावा केल्या, तर २०२२ मध्ये त्यांनी २२३ आणि १९८ धावा केल्या. यावरून येथील फलंदाजांसाठी परिस्थिती सोपी राहणार नसल्याचे दिसून येते. २०२२ मध्ये विराट कोहलीने येथे ७९ धावांची खेळी खेळली आणि जसप्रीत बुमराहने एका डावात पाच विकेट्स घेतल्या, परंतु कीगन पीटरसनच्या खेळीमुळे भारतीय संघ पराभूत झाला.

दक्षिण आफ्रिकेतील यश मुख्यत्वे सलामीच्या जोडीवर अवलंबून आहे, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी सेंच्युरियनमध्ये हे केले नाही. दोघांनी केवळ १३ आणि ५ धावांची भागीदारी केली. चांगली सुरुवात न मिळाल्याने भारताचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला. न्यूलँड्स येथेही गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय जोडीची कामगिरी खराब आहे. २०१८मध्ये मुरली विजय आणि शिखर धवन यांनी १६ आणि ३० धावांची भागीदारी केली, २०२२मध्ये के.एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी ३१ आणि २० धावांची भागीदारी केली होती.

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: भारतीय संघ केपटाऊनला पोहोचताच मोहम्मद सिराज म्हणाला, “हॅपी न्यू इयर”; पाहा Video

केपटाऊनमध्ये भारतीय गोलंदाजांची चाचणी घेतली जाईल: डोनाल्ड

७२ कसोटी सामन्यांत ३३० विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्ड याने केपटाऊनमध्ये भारतीय गोलंदाजांच्या सर्जनशीलतेची कसोटी लागेल, असे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “सेंच्युरियनच्या तुलनेत येथे काम अधिक कठीण होईल, कारण येथील खेळपट्टी सपाट आहे. भारताला विकेट्स घेण्यासाठी जर संधी शोधायची असेल, तर नव्या चेंडूचा हुशारीने वापर करावा लागेल.”

डोनाल्ड त्याच्या अनुभवावरून पुढे सांगतो की, “न्यूलँड्समध्ये दक्षिण आणि पश्चिमेकडून वारे वाहू लागतील, त्यामुळे खेळपट्टी लवकर कोरडी होईल. खेळपट्टीवर चेंडू टर्न होईल, असे मला वाटत नाही. नवीन चेंडू अधिक स्विंग करण्यावर भर दिला जाईल.” डोनाल्ड पुढे म्हणतो की, “कदाचित खेळपट्टी थोड्या वेळाने फिरकीला मदत करेल, परंतु भारत येथे फिरकीपटूंना मैदानात उतरवेल असे मला वाटत नाही.” डोनाल्ड भारतीयांना मोलाचा सल्ला देताना म्हणतो की, “त्यांनी नवीन चेंडू थोडा अधिक पिच करावा आणि २५ ते ३० षटके चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करावा. भारतीय गोलंदाजांनी लवकरच सेंच्युरियनमध्ये शॉर्ट बॉल टाकण्यास सुरुवात केली, ज्याचा फायदा आफ्रिकन फलंदाजांनी घेतला. यावेळी अशी चूक होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa india has never won a test in cape town the opening pair has not had a single half century partnership in 12 years avw
Show comments