भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकूण, कर्णधार ऋषभ पंत आणि भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो एक विक्रम करेल. ०-२ ने पिछाडीवर गेल्यानंतर ३-२ अशी मालिका जिंकणारा तो जगातील पहिला संघ ठरेल. त्याचबरोबर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी २० मालिका जिंकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय कर्णधार होईल.
भारतीय संघाची घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही तिसरी टी २० आंतरराष्ट्रीय मालिका आहे. दक्षिण आफ्रिकेने मागील दोन मालिकांपैकी एक जिंकली होती, तर एक अनिर्णित राहिली होती. द्विपक्षीय टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मायदेशात भारताची कामगिरी खूपच प्रभावी आहे. भारताने २०१६ पासून घरच्या मैदानावर १२ टी-२० मालिका खेळल्या आहेत. या सर्वच्या सर्व मालिका भारताने जिंकल्या आहेत. सध्या भारतीय संघातील खेळाडूंची कामगिरी बघता आजचा सामना जिंकण्यासाठी भारत पूर्ण जोर लावेल, अशी अपेक्षा आहे.
टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे वर्ष ईशान किशनसाठी उत्कृष्ट ठरले आहे. तो या वर्षातील आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर केवळ नऊ डावात ३६७ धावा आहेत. ड्वेन प्रिटोरियस वगळता, त्याने प्रत्येक गोलंदाजासमोर १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. किशन शिवाय उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकदेखील सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
भारतीय गोलंदाजीचा विचार केल्यास, २०२१च्या सुरुवातीपासून मागील टी २० विश्वचषकापर्यंत पॉवरप्लेमध्ये भारताची गोलंदाजी सुमार राहिली होती. या कालावधीमध्ये भारतीय गोलंदाजांनी पॉवरप्ले दरम्यान १३ डावांमध्ये फक्त १४ बळी घेतले होते. टी २० विश्वचषकानंतर मात्र, परिस्थिती बदलली आहे. भारताने पॉवरप्लेमध्ये २३ बळी घेतले आहेत.
टी २० विश्वचषकानंतर भारतीय गोलंदाजांना पॉवरप्लेमध्ये फक्त एकदाच अपयश आले आहे. इतरवेळी त्यांनी पावरप्लेमध्ये दोनपेक्षा जास्त बळी घेतले आहेत. यावरून भारतीय गोलंदाज किती प्रभावी ठरले हे स्पष्ट दिसत होते. टॉप टेनमधील कोणत्याही संघाने पॉवरप्लेमध्ये भारतापेक्षा जास्त बळी घेतलेले नाहीत. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा या टप्प्यातील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे. एकूणच, आजचा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.