India vs South Africa 2nd Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस वेगवान गोलंदाजांच्या नावावर होता. दिवसभरात एकूण २३ विकेट्स पडल्या. यातील २२ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजच्या (६/१५) घातक गोलंदाजीमुळे भारताने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला २३.२ षटकांत अवघ्या ५५ धावांत गुंडाळले. भारताने आपल्या ९१ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर विरोधी संघाला बाद केले आहे. याआधी भारतीय संघाने २०२१ मध्ये मुंबई कसोटीत न्यूझीलंडला ६२ धावांत गुंडाळले होते. भारतीय संघही १५३ धावांवर गडगडला, पण पहिल्या डावात ९८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
मोहम्मद सिराजने केवळ कसोटी क्रिकेटमध्येच सर्वोत्तम गोलंदाजी केली नाही तर कसोटी क्रिकेटच्या पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी सर्वोत्तम गोलंदाजी करणारा कसोटी इतिहासातील दुसरा गोलंदाज बनला. २०१५ मध्ये स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ धावांत ८ विकेट्स घेतल्या होत्या. उपाहारापूर्वी पाच विकेट्स घेणारा सिराज हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी मनिंदर सिंगने १९८७ मध्ये बंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे या सामन्यात भारताला १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
आता ३६ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होऊन भारताला पराभवाला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती भारतीय चाहत्यांना लागली आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ६२/३ आहे. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे ३६ धावांची आघाडी आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचे उर्वरित सात विकेट्स लवकरात लवकर बाद करावे लागतील आणि लक्ष्य निर्धारित केल्यावर ते गाठावे लागेल. भारताला १०० धावांचे लक्ष्य देण्यात आफ्रिकन संघ यशस्वी झाला तरी खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता भारतीय संघाला पराभवाचा धोका असेल.
१९३२ नंतरचा सर्वात कमी धावसंख्या दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेची ही सातवी नीचांकी धावसंख्या आहे. १९३२ नंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वात कमी धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने त्याला दोन्ही डावात ३६ आणि ४५ धावांवर बाद केले होते.
दक्षिण आफ्रिकेची १९९२ नंतरची सर्वात कमी धावसंख्या
धावसंख्या | प्रतिस्पर्धी संघ | स्थान | वर्ष |
५५ | भारत | केप टाउन | २०२४ |
७३ | श्रीलंका | गॅल | २०१८ |
७९ | भारत | नागपूर | २०१५ |
८३ | इंग्लंड | जोहान्सबर्ग | २०१६ |
८४ | भारत | जोहान्सबर्ग | २००६ |