केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि पहिल्या डावात त्यांना केवळ २२३ धावांची भर घालता आली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेलाही चांगली सुरुवात करता आली नाही. त्यांनी कप्तान डील एल्गरला लवकर गमावले. तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच चेंडूवर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एडन मार्करामला क्लीन बोल्ड केले.
बुमराहने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मार्करामला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची सर्व व्यवस्था केली होती. बुमराहचा ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू मार्करामच्या बॅटची कड घेत गलीच्या दिशेने गेला. मात्र, चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाही. अन्यथा मार्कराम दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतला असता.
हेही वाचा – VIDEO : भारताचा अर्धा संघ तंबूत पाठवणारा पाकिस्तानी गोलंदाज रस्त्यावर विकतोय चणे!
पण पुढच्या चेंडूवर बुमराहने जे केले, ते पाहून सर्वच थक्क झाले. त्याचा हा चेंडू झटपट आत आला. मार्करामने चेंडू खेळण्याऐवजी तो सोडला. पण चेंडू इतका वेगात आला की मार्करामच्या दांड्या गुल झाल्या. यापूर्वी बुमराह फक्त इनस्विंग करायचा, पण आता तो आऊटस्विंग करायलाही निष्णात झाला आहे. चेंडू आतील बाजूस येईल की बाहेर जाईल, हे समजणे फलंदाजांना कठीण जात आहे.