IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील भारत दौऱ्यातील मालिकेला तिरुअनंतपुरम येथून सुरुवात होणार असून भारतीय संघ २८ तारखेला म्हणजेच आज दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघ समान समस्येचा सामना करत आहेत. या सामन्यात कुठल्या ११ खेळाडूंसह उतरायचं याचं आव्हान दोन्ही संघांसमोर आहे. सद्यस्थितीमध्ये दोन्ही संघात गोलंदाजीची समस्या आहे. अनेक दिग्गज गोलंदाज आहेत, पण सध्या त्यांचा सूर हरवलेला आहे. अशा परिस्थिती कुठल्या खेळाडूंना संघात स्थान द्यावे आणि कुणाला वगळावं याबाबत निर्णय घेताना कर्णधार आणि प्रशिक्षकांची कसोटी लागणार आहे.

टी२० विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या अंतिम परीक्षेत उतरण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची अवघड परीक्षा रोहितचा संघ पास झाला. पण त्यातून शिल्लक राहिलेल्या काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी भारतीय संघाला आजपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून मिळणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने गोलंदाजीतील कमकुवत बाजूवर भारतीयांना आताच उतारा शोधावा लागणार आहे.

हेही वाचा :  IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना आज रंगणार; कुठे व कधी पाहाल लाईव्ह? 

शेवटच्या षटकातील म्हणजेच स्लॉग ओवर्स मधील गोलंदाजी भारतीय संघाची डोकेदुखी ठरत आहे. त्याचा फटका आशिया करंडक स्पर्धेपासून बसलेला आहे. प्रामुख्याने भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी फारच महागडी ठरलेली आहे, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत त्याला विश्वांती देण्यात आल्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची राहणार आहे. भुवनेश्वर कुमारची विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड झालेली आहे, त्यामुळे आता तो प्रत्यक्ष सामन्यांतून डेथ गोलंदाजीचा प्रश्न सोडवण्याऐवजी थेट विश्वकरंडक स्पर्धेतच खेळेल. दीपक चहर आणि महम्मद शमी यांची राखीव गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. शमी कोरोनातून अजून बरा झालेला नाही, त्यामुळे त्याला आपली तयारी दाखवता येणार नाही, परंतु दीपक चहरसाठी ही नामी संधी आहे.

हेही वाचा :  IND vs SA: भारत व दक्षिण आफ्रिका आज भिडणार; पंड्या, भुवनेश्वरला सुट्टी, कशी असणार टीम इंडियाची बांधणी पाहा 

अष्टपैलू हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आल्यामुळे दीपक चहरला अंतिम संघात खेळण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जसप्रीत बुमरा, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग असे तीन विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेले गोलंदाज आफ्रिकेविरुद्धच्या संघात आहेत.

कशी असेल आजच्या सामन्यातील हवामान आणि खेळपट्टी

ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे स्पोर्ट्स हब, तिरुअनंतपुरम येथे आहे. हे स्टेडियम फुटबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळांसाठी वापरले जाते. केरळ क्रिकेट असोसिएशनतर्फे या स्टेडियमचा वर्षातून १८० दिवस वापर केला जातो. या खेळपट्टीवर इतक्या धावा होत नाहीत, इथे १७० ते १८० धावा पुरेशा आहेत. येथे वेगवान गोलंदाजांची संख्या थोडी आहे पण फिरकीपटूही धावा रोखण्यात प्रभावी ठरतात. नाणेफेक जिंकल्यानंतर संघांना गोलंदाजी करायची असते आणि जो फलंदाज खेळपट्टीवर प्रथम खेळतो तो चांगला खेळू शकतो.

ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हवामान आल्हाददायक असणार आहे, ना खूप उष्ण आहे ना थंड आहे. इथे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे, पण वाऱ्यामुळे चेंडू इतका घसरत नाही. जोरदार पावसाची फारशी शक्यता नाही पण ढगाळ वातावरण राहील. या स्टेडियममध्ये दोन टी२० सामने झाले आहेत, त्यापैकी एक भारताने जिंकला आहे तर दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. वेस्ट इंडिजने टी२० मध्ये सर्वाधिक १७३ धावा केल्या आणि भारताला त्याचा पाठलाग करता आला नाही. एकदिवसीय सामना झाला आहे, ज्यामध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

Story img Loader