IND vs SA Rishabh Pant Captaincy : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय कर्णधार के एल राहुल आणि फिरकीपटू कुलदीप यादव दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेले आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये ऋषभ पंतच्या खांद्यावर भारतीय संघाची जबाबदारी ठेवण्यात आली आहे. तर, उपकर्णधारपदाच्या रुपात हार्दिक पंड्या दिसणार आहे. कर्णधार पद मिळूनही पंत फारसा आनंदी नसल्याचे समोर आले आहे.

सामन्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे काल (८ जून) सांयकाळी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार ऋषभ पंतने माध्यमांशी संवाद साधला. सामन्याच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या कर्णधारपदाबद्दल तो म्हणाला, “ही जबाबदारी मला मिळाली ही चांगली गोष्ट आहे. पण, ज्या परिस्थितीत ही जबाबदारी मला मिळाली आहे, ती फारशी चांगली नाही. मला तासाभरापूर्वीच ही बातमी मिळाली. अजूनपर्यंत मी हे सत्य व्यवस्थित स्वीकारू शकलेलो नाही. संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा एक अद्भुत अनुभव आहे. विशेष म्हणेज मला माझ्याच शहरात संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही फार मोठी बाब आहे.”

२४वर्षीय पंतने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्या अनुभवाचा आपल्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मदत मिळेल, असे त्याचे मत आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे. अशात के एल राहुल आणि कुलदीप यादवही जखमी झाले आहेत. त्यामुळे बहुतेक नवख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला हाताशी धरून पंतला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

हेही वाचा – IND vs SA 1st T20 : आजपासून रंगणार टी ट्वेंटीचा थरार, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्य संघ

ऋषभ पंतने आयपीएलच्या दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे. नुकत्याच संपलेल्या १५व्या हंगामात त्याने संघाच्या फलंदाजीच्या क्रमात अनेक प्रयोग केले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजीच्या क्रमाचा निर्णय सर्वस्वी परिस्थितीवर अवलंबून असेल, असे तो म्हणाला. शिवाय, यापूर्वी ईशान किशन आणि के एल राहुल सलामीला येणार होते. मात्र, आता राहुलच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड सलामीला येण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.

Story img Loader