Rohit Sharma, India vs South Africa 1st Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून (२६ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत संघाच्या योजनेविषयी सांगितले. विश्वचषकातील पराभवानंतर तो म्हणाला की, “ही मालिका जिंकणे हे आमचे ध्येय आहे. संघ पूर्णपणे तयार आहे आणि अंतिम फेरीतील पराभवानंतर आम्ही पुढे सरसावले आहोत.” रोहितने असेही सांगितले की, “कर्णधार या नात्याने आपल्या संघातील इतर खेळाडूंनी जे निकाल मिळवले आहेत ते येथे मिळवावेत अशी माझी इच्छा आहे.” भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी करू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत हिटमॅन खेळला नाही. तो दक्षिण आफ्रिकेतील टी-२० आणि एकदिवसीय मालिकेपासूनही दूर राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा म्हणाला की, “आम्ही या मालिकेसाठी सज्ज आहोत. येथील परिस्थिती गोलंदाजांना मदत करते. सेंच्युरियनमध्ये पाच दिवस फलंदाजी करणे सोपे नाही. आम्हाला याचा अनुभव आहे. जसजसा सामना पुढे जाईल तसतशी आमच्यापुढील आव्हाने वाढतील. या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. संघात याबद्दल चर्चा झाली आहे. आठवड्याभरापूर्वीच आम्ही इथे आलो असून सर्व खेळाडूंना त्यांच्या पद्धतीने खेळण्याचे स्वातंत्र्य आम्ही दिले आहे.”

फिरकीपटूंच्या भूमिकेवर रोहित काय म्हणाला?

हिटमॅन म्हणाला, “येथे सर्व गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे आहे. वेगवान गोलंदाजांशिवाय फिरकीपटूही महत्त्वाचे आहेत. आमच्याकडे दोन अनुभवी फिरकीपटू आहेत (रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा). त्यांच्याकडून इथल्या खेळपट्टीवर संघाला काय हवंय, ते त्यांना माहीत आहे. त्यांच्याशी जास्त बोलण्याची गरज नाही. दोघेही खूप शानदार गोलंदाजी करत आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या हातात चेंडू असतो तेव्हा ते विकेट घेण्याचा प्रयत्न करत असतात.”

वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबद्दल हिटमॅन काय म्हणाला?

रोहित म्हणाला, ‘‘आम्ही विश्वचषकात ज्या प्रकारे खेळलो ते पाहता विश्वचषक गमावणे खूप कठीण होते. आम्हा सर्वांसाठी ते खूप अवघड होते. पहिल्या १० सामन्यांमध्ये आम्ही चमकदार कामगिरी केली होती. अंतिम फेरीत असे होऊ शकले नाही आणि आम्ही हरलो. अशा पराभवानंतर बाहेर पडणे कठीण आहे, परंतु त्यानंतर बरेच क्रिकेट घडत आहे आणि तुम्हाला त्यासह पुढे जावे लागेल. मलाही पुढे जाणे अवघड आहे. आम्हाला बाहेरून खूप पाठिंबा मिळाला. याने मला खूप प्रेरणा दिली.”

हेही वाचा: IND vs SA 1st Test: रोहित शर्माला पत्रकाराने टी-२० वर्ल्ड कपबाबत प्रश्न विचारताच संतापला; म्हणाला, “योग्य वेळ आल्यावर…”

के.एल. राहुल किती काळ विकेटकीपिंग करणार?

भारतीय कर्णधार म्हणाला, “सर्व खेळाडूंच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका असतात. के.एल. राहुल त्यापैकीच एक. विश्वचषकात त्याने विकेटकीपिंग केले. त्याने स्वतः पुढे येऊन हे आव्हान स्वीकारले. यामुळे आम्हाला अतिरिक्त फलंदाज ठेवण्याचे स्वातंत्र्य मिळते. गेल्या वेळी तो इथे सलामीवीर म्हणून खेळला होता, मात्र यावेळी तो मधल्या फळीत खेळणार आहे. तो अनुभवी आहे आणि खेळाच्या वेगवेगळ्या वेळी संघाला त्याच्याकडून काय हवे आहे, हे त्याला ठाऊक आहे. तो किती काळ विकेटकीपिंग करेल, हे आम्हाला माहीत नाही.”

दक्षिण आफ्रिकेत फलंदाजी सोपी आहे का?

हिटमॅन शर्मा म्हणाला, “जेव्हाही तुम्ही अशा खेळपट्ट्यांवर खेळता जिथे उसळी असते, तेव्हा फलंदाजांना ते खूप आवडते. चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. जर तुम्ही त्यांच्या गोलंदाजांविरुद्ध योग्य रणनीती आखली तर तुम्ही धावा करू शकता. मात्र, हे करणे तितके सोपे नाही. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही कधीही बाद होऊ शकता.”

येथील विजयाने विश्वचषकातील पराभवाचे दुःख कमी होईल का?

रोहित पुढे म्हणाला, “आम्ही येथे कधीही मालिका जिंकलेली नाही. जिंकलो तर आनंदच होईल, पण विश्वचषकातील पराभवाचे दुःख कमी होईल की नाही हे माहीत नाही. प्रत्येकजण मेहनत घेत आहे. आपल्याला काहीतरी किंवा दुसरे जिंकायचे आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे खेळाडू आहेत. मोकळेपणाने खेळावे लागेल आणि कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नये.”

हेही वाचा: IND vs SA 1st Test: “जर हा रोहित-कोहलीचा शेवटचा आफ्रिकन दौरा असेल तर…”, द. आफ्रिकेच्या अ‍ॅलन डोनाल्डचे मोठे विधान

मुकेश आणि प्रसिध मध्ये कोण खेळणार?

भारतीय कर्णधार म्हणाला, “मुकेश आणि प्रसिध यांच्यापैकी एकाची निवड करणे कठीण आहे. आम्ही के.एल. राहुल आणि राहुल भाई (द्रविड) यांच्याशी बोललो आहोत. मुकेश आणि प्रसिध हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे गोलंदाज आहेत. प्रसिध उंच आहे आणि खेळपट्टीवरून बरेच काही साध्य करू शकतो. जर मुकेशबद्दल सांगायचे तर सहा महिन्यांत तो खूप सुधारला आहे. आमच्याकडे सिराज आणि बुमराह आहेत. आता मुकेश आणि प्रसिध यांच्यात कोणत्या गोलंदाजाची गरज आहे हे पाहायचे आहे. याबाबत आमची चर्चा सुरू आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa rohit sharma said sad about the defeat in the world cup final said this about the test series from south africa avw