भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्याची पाच सामन्यांची टी २० मालिका काल (१९ जून) संपली. या मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना पूर्ण झाला नाही. परिणामी, पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. पाचव्या सामन्यात जितकी चर्चा पावसाची झाली तितकीच चर्चा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचीही झाली. ऋतुराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे त्याला नेटिझन्सच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या सामन्यात पावसाने दोनदा व्यत्यय आणला. नाणेफेकीनंतर जेव्हा खेळाडूंनी मैदानावर पाय ठेवले तेव्हा लगेचच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे एकही चेंडू न खेळता खेळाडूंना डगआउटमध्ये जाऊन बसावे लागले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशननेही डगआऊटचा आसरा घेतला. त्यावेळी एक ग्राऊंड्समनने डगआउटमध्ये येऊन ऋतुराजसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.
ग्राऊंड्समन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना ऋतुराज नाराजी व्यक्त करताना दिसला. त्याने ग्राऊंड्समनला तिथून निघून जाण्यास सांगितले आणि स्वत: मान वळवून घेतली. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बहुतेक सोशल मीडिया युजर्सनी ऋतुराजच्या अशा वागणुकीवर टीका केली आहे. तर, त्याच्या काही चाहत्यांनी करोनाचा हवाला देत त्याची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.
पाचव्या आणि शेवटच्या टी २० सामन्यात बाद होण्यापूर्वी ऋतुराज फक्त १० धावा करण्यात यशस्वी झाला. लुंगी एनगीडीने त्याला बाद केले होते. संपूर्ण मालिकेत, गायकवाडने एक अर्धशतक केले आहे. पाच सामन्यांमध्ये त्याने एकूण ९६ धावा केल्या.