IND vs SA Sanju Samson broke unwanted record of 15 years ago : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या चार सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ६१ धावांनी शानदार विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या सामन्यात ५० शतकी खेळी साकारणाऱ्या संजू सॅमसनला गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात आपले खातेही उघडता आले नाही. केवळ ३ चेंडूंचा सामना केल्यानंतर सॅमसन खाते न उघडता मार्को यान्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यासह संजू सॅमसनने भारतीय फलंदाज म्हणून एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला.
सॅमसन एका वर्षात सर्वाधिक वेळा टी-२० मध्ये शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज ठरला –
संजू सॅमसनने आता शून्यावर आऊट होऊन १५ वर्षे जुना नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. खरं तर, सॅमसन आता एका वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शून्यावर आऊट होणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता, जो २००९ साली टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते न उघडता तीन वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला होता. सॅमसनला या सामन्यात खातेही उघडण्यात यश आले नाही, तर शेवटच्या दोन डावात त्याने शतके झळकावली होती, त्यामुळे संघासाठी ही फारशी चिंतेची बाब नाही. संजू हा भारतीय क्रिकेटमधला पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय डावात शतके झळकावली आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये वर्षभरात सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झालेले खेळाडू :
संजू सॅमसन – ४ वेळा (२०२४)
युसूफ पठाण – ३ वेळा (२००९)
रोहित शर्मा – ३ वेळा (२०१८)
रोहित शर्मा – ३ वेळा (२०२२)
विराट कोहली – ३ वेळा (२०२४)
भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर १२५ धावांचे लक्ष्य ठेवले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या गोलंदाजांनी भारताला सुरुवातीपासूनच धक्के दिले आणि भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. भारताकडून अष्टपैलू हार्दिक पांड्याने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद ३९ धावा केल्या. हार्दिक व्यतिरिक्त अक्षर पटेलने २१ चेंडूत २७ आणि तिलक वर्माने २० चेंडूत २० धावा केल्या.