Dean Elgar to retire from international cricket after India Test : दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटी कर्णधार डीन एल्गरने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो भारताविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. एल्गरची आतापर्यंतची चमकदार कारकीर्द आहे. सुमारे १२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने ८४ सामने खेळले. या कालावधीत १३ शतके आणि २३ अर्धशतके झळकावली आहेत. एल्गर हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत सहभागी आहे. तो शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळणार आहे. हा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
केपटाऊनमध्ये कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार –
क्रिकइन्फोवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार एल्गरने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. तो केपटाऊनमध्ये भारताविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. निवृत्तीबाबत एल्गर म्हणाला,‘‘क्रिकेट खेळणे हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे. माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. १२ वर्षे आपल्या देशासाठी खेळणे हे एका मोठ्या स्वप्नासारखे आहे. केपटाऊनमध्ये कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. हे माझे आवडते स्टेडियम आहे.”
एल्गरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ८४ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने १३ शतके आणि २३ अर्धशतके केली आहेत. एल्गरची कसोटी सर्वोत्तम धावसंख्या १९९ धावा आहे. त्याने ५१४६ धावा केल्या आहेत. त्याने गोलंदाजीतही हात आजमावला आहे. एल्गरने ४५ कसोटी डावात १५ विकेट घेतल्या आहेत. या काळात एका डावात २२ धावांत ४ विकेट्स घेणे ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. एल्गरने ८ वनडे सामनेही खेळले आहेत. पण यात काही विशेष करू शकलो नाही. त्याने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.
हेही वाचा – IND vs SA : विराट कोहली अचानक परतला मायदेशी, तर ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना २६ डिसेंबरला होणार आहे. हा सामना सेंच्युरियनमध्ये होणार आहे. दुसरा सामना ३ जानेवारीला केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. एल्गरच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असेल.