Suryakumar Yadav Injury Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (१४ डिसेंबर) जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात विकेट्सच्या बदल्यात २०१ धावा जमवल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात द. आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांत गारद झाला. भारताने हा सामना १०६ धावांनी जिंकला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. तर तिसरा सामना भारताने जिंकल्यामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आहे.
दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत झाली आहे. पायाच्या घोट्याजवळ सूर्यकुमारला दुखापत झाली आहे. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला उभं राहता येत नव्हतं. शेवटी फिजिओ आणि सपोर्ट स्टाफने त्याला उचलून मैदानाबाहेर नेलं. सूर्या मैदानाबाहेर गेल्यावर रवींद्र जाडेजाने संघाचं नेतृत्व कलं. सूर्याने या सामन्यात शतक ठोकलं होतं. या सामन्यातील विजयानंतर सूर्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
सूर्यकुमार यादव हा सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरचा फलंदाज आहे. भारतीय संघ द. आफ्रिकेनंतर अफगाणिस्तानविरोधात टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतात इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आयपीएलपाठोपाठ भारत टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. परंतु, सूर्यकुमार यादवची दुखापत पाहता तो पुढच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. उभय संघांमध्ये ११ जानेवारी २०२४ पासून टी-२० मालिका खेळवली जाईल.
सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना सूर्यकुमार यादव म्हणाला, मला आता बरं वाटतंय. मी चालू शकतो. दुखापतीनंतर सावरणं ही आनंद देणारी भावना असते. त्यातही तुम्ही शतक फटकावलं असेल आणि सामनादेखील जिंकलात तर अजूनच आनंद होतो.