IND vs SA 5th T20 Updates : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान सुरू असलेली पाच सामन्यांची टी २० मालिका रंगतदार स्थितीमध्ये आली होती. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा निर्णायक सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना शेवटी रद्द करण्यात आला. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. शेवटचा सामना रद्द झाल्यामुळे ही मालिका बरोबरीत सुटली आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खेळाडू मैदानात उतरल्याबरोबरच पहिल्यांदा पाऊस सुरू झाला. त्यावेळी ४५ मिनिटे खेळ थांबला गेला. सात वाजून ५० मिनिटांनी खेळ सुरू करण्यात आला. भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. लुंगी एनगिडीने सलामीवीर ईशान किशनला बाद केले होते. त्यानंतर तिसऱ्याच षटकात ऋतुराज गायकवाडही बाद झाला. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबला. त्यावेळी भारताचा धावफलक दोन बाद २८ असा होता.

बंगळुरूमध्ये पावसाची संततधार सुरूच राहिल्याने शेवटी सामनाधिकाऱ्यांनी लढत रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका बरोबरीत राहिली आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यापैकी दिल्ली आणि कटकमधील टी २० सामने जिंकून पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत विशाखापट्टणम आणि राजकोट येथील दोन्ही सामने जिंकून २-२ अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे आजचा शेवटचा सामना निर्णायक ठरणार होता. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द झाला.

हेही वाचा – एसीसीकडून भारत-पाक क्रिकेट चाहत्यांना मिळणार सरप्राईज! जाणून घ्या काय ते

चार सामन्यांमध्ये सहा बळी मिळवणाऱ्या भुवनेश्वर कुमारला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. कुमारने आतापर्यंत शानदार गोलंदाजी करून आफ्रिकन फलंदाजांना अडचणीत आणले होते. ‘एक गोलंदाज म्हणून मालिकावीराचा सन्मान मिळणे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात जास्तीत जास्त एकाग्र राहून कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल,’ अशी प्रतिक्रिया कुमारने दिली.

मालिकेच्या पूर्वसंध्येला कर्णधार के एल राहुल जखमी झाल्याने ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ही मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात पहिली टी २० मालिका जिंकण्याची संधी पंतला मिळाली होती. मात्र, बंगळुरूतील पावसात ही संधीदेखील वाहून गेली. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यामुळे आता भारतीय टी २० संघ आयर्लंडचा दौरा करणार आहे. तर, भारतीय कसोटी संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे.

Story img Loader