तीन सामन्यांच्या टी २० आणि कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात रविवारी पोहोचला. विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची ही पहिलीच मालिका आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियात खेळण्यात येणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका त्यांच्यासाठी महत्वाची आहे. तशातच या मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघात नेतृत्वबदल करण्यात आला असून त्यांना भारताच्या ‘इन-फॉर्म’ खेळाडूंशी दोन हात करायचे आहे. भारताचा हा पेपर त्यांच्यासाठी कठीण असल्यामुळे भारतात येताच आफ्रिकन खेळाडूंनी तयारीला सुरूवात केली आहे.
आफ्रिकन क्रिकेट मंडळाने ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये आफ्रिकेचे खेळाडू जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. याबाबत क्रिकेट मंडळाने लिहीले आहे, “भारतात दक्षिण आफ्रिकेचा संघ दाखल झाला. टी २० मालिकेसाठी निवडण्यात आलेले खेळाडू एकत्र आले आणि तीन सामन्यांच्या मालिकेसाठी तयारीला सुरूवातदेखील करण्यात आली.”
Touchdown #IncredibleIndia! The #ProteaFire T20 squad has assembled & preparation for the three-match series has begun. First up, shaking off that long-haul flight stiffness. pic.twitter.com/YiIzBK4zIh
— Cricket South Africa (@OfficialCSA) September 8, 2019
आफ्रिकेचा संघ ९ सप्टेंबरला पंजाबमधील धर्मशाळासाठी रवाना होणार आहे.
दक्षिण आफ्रिका टी २० संघ – क्विंटन डी-कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), वॅन डर डसन (उप-कर्णधार), टेम्बा बावुमा, ज्युनिअर डाला, बिजॉर्न फॉर्च्युन, ब्येरन हँड्रीक्स, रेझा हँड्रीक्स, डेव्हिड मिलर, अॅन्रिच नॉर्ट्जे, अँडील फेलुक्वायो, ड्वेन प्रेटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, जॉन जॉन स्मट्स
तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आलेली असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील विजयी संघात फक्त एकमेव बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला खेळाचा ताण पाहता व्यवस्थापन कार्यक्रमानुसार संघात स्थान देण्यात आलेले नाही.